पुणे : महापालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात आलेल्या मिळकतकराच्या बिलांवर ४० टक्के सवलत मिळाली आहे की नाही, याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिलांवर पालिकेने सवलतीचा उल्लेख करावा, अशी मागणी वारंवार पालिकेकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला.
महापालिकेने १ मेपासून मिळकतकराची बिले नागरिकांना पाठविण्यास सुरुवात केली आहे. साडेबारा लाख बिले महापालिकेने तयार केली असून, संबंधित नागरिकांना पोस्टाने, तसेच प्रत्यक्ष हातात दिली जात आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्यासाठी पालिकेने पीटी ३ अर्ज सादर करण्याचे आवाहन मिळकतदारांना केले होते. त्यानुसार अनेकांनी पीटी ३ अर्ज सादर केले. परंतु, ही सवलत मिळाली की नाही, हे समजण्यासाठी या बिलांवर ४० टक्के सवलतीचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार या वर्षीच्या मिळकतकराच्या बिलांवर सवलत दिल्याचा दावा पालिकेच्या करआकारणी विभागाने केला आहे. मात्र, ज्या बिलांवर उल्लेख केला नाही. त्यांना ही सवलत मिळाली की नाही, यावरून पुन्हा गोंधळ उडाला आहे.
महापालिकेने मिळकतकराचे जे बिल नागरिकांना पाठविले आहे. त्यामध्ये सवलत मिळाली की नाही, याला उलगडा नागरिकांनाच काय, तर कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनाही बिल बघून समजत नसल्याचे वेलणकर यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी एक महिना बिले उशिरा देऊनही ४० टक्के सवलतीचा स्पष्ट उल्लेख बिलावर छापण्यात पालिकेला अपयश आले असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला.
महापालिकेने ज्या नागरिकांना ४० टक्के सवलत दिली आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख बिलांवर करण्यात आला आहे. ज्यांच्या बिलांवर हा उल्लेख नाही. त्यांना सवलत मिळालेली नाही. त्यांनी पालिकेकडे पुन्हा अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना सवलत मिळाली नसेल.- पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका