पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या सराइताला वानवडी पोलिसांनी पकडले. तरुणाकडून तीन किलो आणि दुचाकी जप्त करण्यात आली.शैलेश शंकर सूर्यवंशी (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वानवडी भागातील सराइतांची पाेलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. दुचाकीस्वार सूर्यवंशी गंगाधाम चौकातून हडपसरकडे निघाला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड आणि गोपाळ मदने यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर भागातील रामटेकडीतील पुलावर सापळा लावला. पोलिसांच्या पथकाने दुचाकी थांबविली. दुचाकीस्वार सूर्यवंशीची चौकशी केली. दुचाकीची डिकी उघडून पाहिली. तेव्हा डिकीत गांजा सापडला. डिकीतून ६० हजार रुपयांचा तीन किलो ५६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सूर्यवंशी याच्याकडून दुचाकी, मोबाइल संच जप्त करण्यात आला.
सूर्यवंशी याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्रीप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर, अमोल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, बालाजी वाघमारे यांनी ही कारवाई केली.