Pimpri Waste To Fertilizer Project पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर कचरामुक्त करणे आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भर दिला जात आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दीडशे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आवारातच खतनिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. या सोसायट्यांकडून दरदिवशी ३८.६७ टन कचरा जिरवला जात असून, त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचराही वाढत आहे. एका दिवसाला एक हजार ४०० टन कचरा संकलित होत आहे. शहरातील कचरा मोशी डेपोत टाकला जातो. येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. तिथे जागा कमी पडत आहे. शंभरहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या हाउसिंग सोसायट्यांना त्यांच्या आवारामध्ये ओल्या कचऱ्याची कंपोस्टिंगच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला दीडशे सोसायटीधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सोसायट्यांनी आवारातच खतनिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. तिथे ओला कचरा जिरवला जात आहे. प्रतिदिन ३८.६७ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यातून निर्माण होणारे खत उद्यान, बाग व कुंडीसाठी वापरले जाते.
‘शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यामध्ये ४० टक्क्यांहून अधिक सेंद्रीय घटक आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सेंद्रीय पद्धतीचा वापर केला जातो. सेंद्रीय कचऱ्याच्या विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे कंपोस्ट खत तयार करणे आहे. या खतामध्ये पोषक द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांमध्ये कंपोस्टिंगबाबत जनजागृती केली जात असल्याचे आराेग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.हे खत पर्यावरणीय अनुकूल असल्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते, असेही त्यांनी स्पप्ट केले.
क्षेत्रीय कार्यालय साेसायटी संख्या प्रतिदिन जिरवला जाणारा कचरा (टनामध्ये)
अ ४८ १०.५
ब १० २.३
क ८ ३.८५
ड ५४ १२.५
इ ६ २.३४
फ ७ २.८
ग १३ ३.१५
ह ४ १.२३
एकूण १५० ३८.६७ टन
गृहनिर्माण सोसायट्यांनी ओला कचरा कंपोस्ट करून जिरविण्यासाठी प्रोत्साहित करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याला सोसायट्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात आणखी सोसायट्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका