लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही महिन्यांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. देशातील सरासरी पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे. त्यात बिहारमध्ये फक्त सात टक्के, तर आंध्र प्रदेशात नऊ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, चार एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशांतील मोठ्या १५० प्रकल्पांमध्ये एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ३५ टक्के म्हणजे ६१.८०१ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा ७४.४७० अब्ज घन मीटर पाणीसाठा होता. देशभरात उन्हाच्या झळा वाढत आहेत. देशाचे सरासरी तापमान ३८ ते ४० अंशांवर गेले आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईही गंभीर होऊ लागली आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.

दक्षिणेकडील राज्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. धरणांमध्ये फक्त २० टक्के म्हणजे १०.५७१ अब्ज घन मीटर पाणीसाठा असून, तो सरासरीच्या २८ टक्क्यांनी कमी आहे. आंध्र प्रदेशात ९ टक्के, तेलंगणात २५ टक्के, कर्नाटकात २२ टक्के, केरळात ४२ टक्के आणि तमिळनाडूत २४ टक्के पाणीसाठा आहे. उत्तरेकडील अन्य राज्यांच्या तुलनेत बिहार भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. बिहारमधील धरणांत अवघा सात टक्के पाणीसाठा आहे. बिहारमध्ये एकच मोठे धरण आहे. या धरणाची साठवण क्षमता ०.१३६ अब्ज घन मीटर आहे. सध्या या धरणात फक्त ०.००९ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा सरासरीच्या ७८ टक्क्यांनी कमी आहे.

आणखी वाचा-शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?

कोणत्या राज्यांत मुबलक पाणी?

केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, चार एप्रिल रोजी झारखंडमध्ये ६२ टक्के, मध्य प्रदेशात ५० टक्के, ओडिशात ४६ टक्के, छत्तीसगडमध्ये ४५ टक्के, त्रिपुरात ४३ टक्के, गुजरातमध्ये ४३ टक्के, केरळमध्ये ४२ टक्के आणि पंजाबमध्ये ४१ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मोठ्या धरणांतील आहे. संबंधित राज्यांत झालेला अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवरील तलावांमधील पाण्याचा सिंचन आणि पिण्यासाठीचा वापर, भूजलाचा उपसा आदी कारणांमुळे मोठ्या धरणांतील पाणीसाठा सुरक्षित राहिला आहे.

महाराष्ट्रातील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर

राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार, सात एप्रिल रोजी महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे. औरंगाबाद विभागात सर्वांत कमी १८.३१ टक्के पाणीसाठा आहे, जो गेल्या वर्षी ४४.६८ टक्के होता. अवकाळी पावसामुळे नागपूर आणि अमरावती विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर विभागात ४७.५४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात नागपूर विभागात २८.७८ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ४७.८८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ४७.१९ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागात ४८.९८ टक्के पाणीसाठा आहे, जो गेल्या वर्षी ५१.१० टक्के होता. नाशिक विभागात ३६.९१ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात ३४.१७ टक्के पाणीसाठी आहे, जो गेल्या वर्षी ४५.२१ टक्के होता.

आणखी वाचा-काँग्रेस, वंचितच्या उमेदवाराला मतदारांची मदत; भाजप उमेदवाराकडून मतदारांना ‘मोदींचा नमस्कार’

भूजल उपशावर नियंत्रण नाही

एकूण पाणी वापरापैकी सुमारे ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यात भूजलाचा वाटा मोठा असतो. काही राज्यांत जास्त पाणी शिल्लक असल्याचे दिसते. त्या राज्यांत शहरांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शहरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे धरणांतील पाणी शहरांकडे वळविले जाते. दीर्घकालीन पाणी नियोजन करायचे असल्यास उपलब्ध पाणी आणि पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. भूजल उपशावर देशभरात ठोस नियंत्रण नाही, असे मत जलतज्ज्ञ गुरुदास नूलकर यांनी व्यक्त केले.