पिंपरी: यंदा राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी घाटमाथा असल्याने मावळ पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने पवना धरणात सप्टेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के पाणीसाठा होता. मात्र सध्या धरणात ८९.०२ टक्के म्हणजे मे २०२४ अखेर पुरेल एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून १३ असे ५९३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी उचलते. यंदाच्या पावसाळ्यात मावळ घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात दोन हजार ८३३ मिली मीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा… पुण्यात रक्ताच्या टंचाईचे सावट; रक्तदान तातडीने वाढल्यास परिस्थिती सुधारणार

चारवेळा धरण शंभर टक्के भरले होते. महापालिका पावसाळ्याचे चार महिने नदीतून पाणी उचलते. त्यामुळे सप्टेंबरअखेर धरणात शंभर टक्के पाणीसाठा होता. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. धरणात ८९.०२ टक्के साठा असून गतवर्षी आजच्या तारखेला ९१.१९ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा २.१७ टक्के साठा कमी आहे.

चार वर्षांपासून पाणीकपात

पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींमुळे सर्व भागाला समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. चार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून पाण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. उंचावरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. कमी दाबाने, पुरेशा पाणी येण्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे.

२०२५ पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा

भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनी, अशुद्ध उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी शहरवासीयांना २०२५ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणात आजमितीला ८९.०२ टक्के साठा आहे. महापालिका, एमआयडीसीला पाणी पुरवठा केला जातो. या मागणीप्रमाणे मे अखेरपर्यंत पाणी पुरेल. पाण्याची अडचण येईल, असे दिसत नाही. – रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण