लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : डेक्कन जिमखाना भागात व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून, आंतराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत पाच कोटी रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विश्वनाथ रतन गायकवाड (वय ३८, रा. खोपडेनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वन्यजीव कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना भागातील कॅफे गुडलकजवळ एकजण थांबला आहे. तो व्हेल माशाची उलटीची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना खबऱ्याने दिली. आंतराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत मोजली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून विश्वनाथ गायकवाडला पकडले.

आणखी वाचा-लोक अदालतीद्वारे १७०० वाहनचालकांचा दंड झाला कमी; तडजोड करून दंड कमी करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

गायकवाड याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत व्हेल माशाची उलटी सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत या घटनेची माहिती भांबुर्डा वनविभागातील रक्षक कृष्णा हाके यांना दिली. हाके यांनी तपासणी केली. तेव्हा गायकवाडकडून जप्त करण्यात आलेली उलटी व्हेल माशाची असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत उलटीची किंमत पाच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, बोरसे, धनश्री सुपेकर, सचिन गायकवाड, रोहित पाथरुट, महेश काळे, धनाजी माळी, दशरथ गभाले आदींनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हेल माशाची उलटी कोट्यवधींना

व्हेल माशाच्या उलटीचा वापर सौंदर्य प्रसाधने, अत्तर निर्मितीसाठी होतो. आंतराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत मोजली जाते. समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाची उलटी तरंगत येते. उलटी दगडासारखी दिसते.