पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अखिल भारती तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी (एमएसबीटीई) संलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये यंदापासून बदल केले जाणार आहेत. त्यानुसार सहा सत्रे आणि तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १२० ते १३२ श्रेयांक दिले जाणार असून, औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून ते बारा आठवड्यांचे करण्यात आले आहे.
यंदापासून राज्यातील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर आता अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातही बदल करण्यात येणार आहे. पदविका प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर २०२५पर्यंत टप्याटप्प्यावे विकसित करण्यात येईल.
तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले, की एकूण ४९ एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून के स्कीम या नावाने संबोधले जाणार आहे. हा अभ्यासक्रम अध्ययन निष्पती, श्रेयांक आधारित आहे. त्यात प्रत्येक सत्रासाठी वीस ते बारवीस श्रेयांक आहेत. प्रादेशिक गरजांचा अभ्यास करून तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात विशेष समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
विविध विषय, स्वयंअध्यन…
विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकरिता योग आणि ध्यानसाधना, भारतीय ज्ञानपरंपरा, भारतीय संविधान असे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्यासाठी स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन होणार आहे. तसेच मल्टिपल एन्ट्री- मल्टिपल एक्झिटची तरतूद करण्यात येत असून प्रथम वर्षानंतर बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्याना सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन, दुसऱ्या वर्षानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन व्होकेशन आणि तिसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असे प्रमाणपत्र दिले जाईल.