पुणे : राज्यात पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (टीईटी) गैरप्रकारात उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत, तसेच उमेदवारावर गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवारांकडून शपथपत्र घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे यांनी या संदर्भातील निर्देश शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिले. टीईटी २०१९मधील गैरप्रकारांच्या अनुषंगाने पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत, ज्यांनी सीटीईटी किंवा बीएड या आधारावर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) २०२२ ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी शिक्षणसेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायनिर्णय पारित झाले आहेत, त्या उमेदवारांबाबत काय कार्यवाही करायची याबाबतचे स्पष्टीकरण या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
‘सर्व उमेदवारांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी नियुक्ती अधिकाऱ्यांनी आवश्यक तो पाठपुरावा करावा. उमेदवारांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे किंवा त्यास सहआरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये. उमेदवारावर अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही अथवा त्यास सहआरोपी करण्यात आलेले नाही, असा अहवाल प्राप्त झाल्यास नोटरी केलेले शपथपत्र उमेदवाराने सादर केल्यास त्यास शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी,’ असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास…
उमेदवारांवर भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास अथवा त्यांना सहआरोपी करण्यात आल्यास याबाबत तातडीने शिक्षण आयुक्त, तसेच परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना कळवण्यात यावे, अशा सूचना सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याच परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
प्रकरण नेमके काय?
राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा २०१९मध्ये घेण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा तपासात पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. तपासादरम्यान परीक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचीही कसून तपासणी करण्यात आली असता, ७ हजार ८८० उमेदवारांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे उघड झाले. निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांनी गैरप्रकार करून पात्र करून घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी संबंधित उमेदवारांची यादी आणि अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यानुसार परीक्षा परिषदेकडून राज्य समितीत ठरावही मंजूर करून उमेदवारांची यादी, कारवाईचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले. टीईटी २०१९मधील घोटाळ्यामुळे राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.