Swargate Pune Rape Case Update : पुण्यातील स्वारगेट या अत्यंत गजबजलेल्या एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. हे बलात्कार प्रकरण बुधवारी सकाळी उजेडात आल्यानंतर विरोधक, विविध संघटना, सामान्य माणसं आणि महिला कार्यकर्त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी १३ पोलीस पथके तैनात केली होती. तसंच, त्याला शोधून देणाऱ्याला १ लाखांचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं होती. दरम्यान, शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे त्याला पोलिसांनी अटक केली. हा आरोपी नक्की कोण? त्याची पार्श्वभूमी काय? हे जाणून घेऊयात.

सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित तरुणीने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे (३५) आहे. तो पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट येथे राहणारा आहे. त्याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेविरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात अर्ध्या डझनहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सोनसाखळी चोरीचेही प्रकरण त्याच्यावर नोंद आहेत. २०१९ मध्ये तो एका चोरीच्या प्रकरणातून तुरुंगातून जामिनावर सुटला आहे. तसंच, २०२४ मध्येही पुण्यात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.”

आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी स्थानकावर सतत वावर असायचा. तसंच, तो एका पक्षातील आमदाराचा कार्यकर्ता असल्याचीही बाब पुढे आली आहे. दरम्यान, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली असून त्याच्या आई-वडिल आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिचीही चौकशी करण्यात आली. तसंच, त्याच्या १० मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर आहेत.

मैत्रिणीच्या चौकशीतून काय निष्पन्न झालं?

गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक मागितले होते. त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. गाडेने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

आरोपीची पत्नी खेळाडू

आरोपी दत्तात्रेय गाडेची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून पत्नी व आठ वर्षाचा मुलगा आहे. तर त्याचे आई-वडील शेतात काम करतात. त्याला एक भाऊ आहे. गाडेच्या पत्नी या खेळाडू असून काही वर्षापूर्वी पोलीस भरतीसाठीही प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गाडेवर चोरीच्या गुन्हा सह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी

आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी स्थानकात वावर असायचा. मंगळवारी सकाळी परगावी निघालेल्या तरुणीकडे त्याने एसटीतील वाहक असल्याची बतावणी केली आहे. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे. एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. संबंधित बसचालकाचा पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे