भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत चढाओढ पाहायला मिळतेय. मोठा भाऊ या नात्याने राष्ट्रवादीने या जागेवर दावा ठोकला आहे तर, जिंकेल त्याची जागा असं सूत्र संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि संजय राऊत आमने सामने आले असून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. संजय राऊतांचं म्हणणं काय? "कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याक करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असं ट्वीट आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. हेही वाचा >> पुण्याची जागा कोण लढवणार? संजय राऊतांचं अजित पवारांच्या भूमिकेवर सूचक ट्वीट; म्हणाले… अजित पवारांची भूमिका काय? तर, “सातत्याने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तिथे ते पराभूत होत आहेत. असं असेल तर तिथे त्यांच्या मित्रपक्षांपैकी कुणाची ताकद असेल तर त्याला ती जागा दिली पाहिजे. अर्थात, अजून ते अंतिम झालेलं नाही. ती जागा (पुणे लोकसभा मतदारसंघ) आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे”, असंही अजित पवार म्हणाले काल (२८ मे) म्हणाले होते. हेही वाचा >> पुण्याच्या जागेवरून मविआत खडाजंगी होणार? अजित पवार म्हणतात, “काँग्रेसनं काहीही म्हटलं, तरी…!” जयंत पाटील काय म्हणाले? या दोन्ही नेत्यांच्या वादावर जंयत पाटील यांनी संयमाची भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. "विरोधक एकत्र येतील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल. वेगवेगळे नेते आपआपल्या परीने बोलत असतात. याचा अर्थ तो वाद आहे असं होत नाही. एकत्र बसले की आमचे सगळे वाद मिटतात," अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सरकारचा द्वेष दिसला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हलवण्यात आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका केली आहे. "सावरकरांचा कार्यक्रम करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील द्वेष दिसला. या दोन महिला कर्तबगार महिला, ज्यांनी देशासमोर आदर्श ठेवला. आज महिला शिकलेल्या आहेत, त्याचं सर्व श्रेय सावित्रीबाईंना जातं. संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे की सरकारच्या मनात या दोन घटकांबद्दल काय भूमिका आहे ती", असं जयंत पाटील म्हणाले.