पुणे : हिवाळ्याच्या काळात दिल्लीत पडणाऱ्या प्रचंड धुक्याचा अभ्यास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘विंटर फॉग एक्स्पेरिमेन्ट’ (वायफेक्स) या अभ्यास प्रकल्पाने यंदा दशकपूर्ती केली आहे. या प्रकल्पातून धुक्याच्या अंदाज वर्तवण्यासाठी विकसित झालेले प्रारूप नियमितपणे वापरले जात आहे. पहिल्या प्रयोगाच्या यशानंतर आता ‘वायफेक्स’ प्रकल्पाचे विस्तारीकरण केले जाणार असून, अधिक व्यापक स्तरावर अभ्यास करून अंदाज नेमका देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) राबवण्यात आलेल्या वायफेक्स प्रकल्पाच्या दशकपूर्तीनिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आयआयटीएमचे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव, शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे, डॉ. संदीप वाघ या वेळी उपस्थित होते. ‘वायफेक्स’ प्रकल्पाअंतर्गत हिवाळ्यातील धुक्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशोधनासाठी विविध यंत्रे, सेन्सर्स बसवण्यात आले. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे धुक्याचा अंदाज वर्तवण्यासाठी प्रारूप तयार करण्यात आले. या प्रारूपचा वापर विमानसेवेसाठी विमानतळांवर केला जातो. या प्रारूपची अचूकता ८५ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. रवीचंद्रन म्हणाले, धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत होण्यापासून अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, त्यातून अर्थव्यवस्थेलाही फटका बसतो. त्यामुळे धुक्याच्या अभ्यासासाठी ‘वायफेक्स’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाच्या यशानंतर आता विमानसेवेच्या पलीकडे वाहतूक, रेल्वे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सेवा देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दहा वर्षांत प्रचंड प्रमाणात विदा उपलब्ध झाला आहे. त्यातून धुक्याचे अंदाज वर्तवले जातात, उपाययोजना केल्या जातात. आता या प्रकल्पाला अधिक व्यापक स्वरुपात राबवण्यासाठी विमानतळांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यात ईशान्य भारतातील काही विमानतळांचाही समावेश आहे. अधिक व्यापक अभ्यास करून धुक्याचा अंदाज नेमका देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डोंगराळ भागासाठी स्वतंत्र प्रारूप
गेल्या दहा वर्षांच्या अभ्यासातून दिल्लीतील धुक्यासंदर्भातील काही माहिती हाती आली. त्यानुसार प्रदूषण, रासायनिक घटकांमुळे धुके अधिक वेळ राहते. दहा वर्षांच्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आता अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोएडा, ईशान्य भारतातील काही विमानतळांवरही हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ईशान्य भारतातील धुक्याचा अधिक वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. तो डोंगराळ भाग असल्याने तेथील धुक्याचे स्वरूप वेगळे आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर श्रीनगरमध्ये अभ्यास करण्यात आला. त्यातून डोंगराळ भागातील धुक्याचे स्वरूप वेगळे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डोंगराळ भागासाठीचे स्वतंत्र प्रारूप विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे डॉ. घुडे यांनी सांगितले.