पिंपरी : मुंबई-बंगळुरू महामार्ग किवळे ते वाकडदरम्यान १२ मीटर रुंद केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. बाधितांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांकच्या (एफएसआय) माध्यमातून परतावा देण्यात येणार आहे.

शहरातील किवळे ते वाकडदरम्यान बंगळुरू महामार्ग आहे. या रस्त्यालगत असणारा १२ मीटर रस्ता विकसित करण्याची तयारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दर्शविली आहे. महापालिकेच्या विकास योजनेमधील जागा ताब्यात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी, किवळे भागातून हा महामार्ग जातो. १२ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : लोकअदालतीत तडजोडीसाठी ७५ हजार ४०४ दावे

बाधितांना टीडीआर, एफएसआयच्या मोबदल्यात आगाऊ ताबा देण्यासाठी प्रपत्र ”अ”, ”ब” च्या माध्यमातून महापालिकेकडे प्रकरण दाखल करावे लागणार आहे. जमीन मालकांकडून प्रस्ताव आल्यानंतर मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार टीडीआर, एफएसआय दिला जाणार आहे. भूसंपादन कायद्याने निवाडा जाहीर झाल्यास टीडीआर, एफएसआयचा पर्याय जमीन मालकास उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा रोख स्वरुपातील मोबदला दिला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> मोटारीतून येऊन महावितरणच्या रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी टोळी गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात देण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाकरिता आवश्यक असलेल्या क्षेत्राचा ”अ” आणि ”ब” प्रपत्राच्या माध्यमातून आगाऊ ताबा देण्याची कार्यवाही करावी. शिबिरात जमिनीची कागदपत्रे जागेवरच तपासली जातील. – प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना, विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका