लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गळ्याभोवती मांजाचा फास आणि जणू बेड्या घालाव्यात असे जखडलेले पाय अशा मरणासन्न अवस्थेतून ‘राखी सातभाई’ पक्ष्याने मंगळवारी सकाळी आकाशात भरारी घेतली. शाळेतही न जाणाऱ्या चार ते पाच वर्षे वयाच्या चार चिमुकल्यांनी सुंदराबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांच्या मदतीने या पक्ष्याला जीवनदान दिले. वडगावशेरी सोपाननगर येथे सकाळी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पक्षी उडून गेला तेव्हा चिमुकल्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

ग्रे बाबलेर म्हणजे राखी सातभाई नावाचा चिमणीसारखा दिसणारा सतत आपल्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत निसर्गाची शोभा आणि फिरणाऱ्यांना आनंद देणारा पक्षी. गळ्याभोवती, दोन्ही पायाभोवती मांजा अडकून बसलेल्या फासाने जमिनीवर पडला होता. त्या माळरानावर खेळत असणारी कृष्णा राठोड, वैष्णवी राठोड, पूजा राठोड आणि सोनाली राठोड या साधारण एकाच वयाच्या बालकांचे या पक्षाकडे लक्ष गेले. जवळच फिरत असलेल्या मांजर आणि कुत्र्यापासून आधी त्यांनी या पक्ष्याचे रक्षण केले. त्यांच्यापैकी कृष्णा राठोड याने तेथून फिरण्यासाठी जात असलेले संजय सोमवंशी यांना बोलावून पक्षी होता त्या ठिकाणी आणले.

आणखी वाचा- मित्रांवर प्रभाव पाडण्यासाठी पिस्तुलातून खडकवासला धरण परिसरात गोळीबार

सोमवंशी म्हणाले, मी जवळच रहात असल्याने घरी जाऊन कात्री आणि हळद घेऊन आलो. धाडसाने पक्ष्याला हातामध्ये घेऊन कात्रीने त्याच्या पायाला आणि मानेला मांजापासून मोकळे केले. झोपडीत राहणाऱ्या लहान मुलांनी पक्ष्याला पाणी पाजले. त्याच्या मानेला आणि पायांना मांजा लागून दुखापत झाली होती. तेथे हळद लावली. पाणी पिऊन ताजातवाना झालेला पक्षी पुन्हा एकदा स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी उडून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षणापासून दूर असूनही संवेदनशील मनाच्या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘तुम्ही ही जगा आणि पक्ष्यांनाही जगू द्या’ हा संदेश चिमुकल्या चौघांनी आपल्या कृतीतून दिला आहे, याकडे सोमवंशी यांनी लक्ष वेधले.