देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अन् आरोपीला अटक

पिंपरी- चिंचवड: पुण्याच्या देहू रोड परिसरात मेंढपाळ महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लक्ष्मण गुरू याला अटक करण्यात आली आहे. महिलेला शिवीगाळ करून, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. अनाबाई राहुल पांडुळे, असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी, तक्रारदार अनाबाई त्यांच्या इतर नातेवाइकांसह देहू रोड परिसरातील दत्त मंदिराजवळ लष्कराच्या मोकळ्या मैदानात मेंढ्या चारत, त्यांची देखरेख करत होत्या. याचदरम्यान आरोपी लक्ष्मण गुरू तिथे आला. तो त्यांना, “तुम्ही इथून तुमच्या मेंढ्या काढा. त्या गवतावर मूत्र विसर्जन करतात. त्यामुळे आमची म्हैस गवत खात नाही,” असं म्हणाला. त्यावर तक्रारदार महिलेने “ही जागा तुमच्या मालकीची आहे का”, असा प्रश्न विचारताच रागाने लाल झालेल्या आरोपी लक्ष्मण गुरूने हातातील काठीने अनाबाईच्या हातावर बेदम मारहाण केली. त्यामुळे अनाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना शिवीगाळ करून, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाणही केली गेली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर जखमी अनाबाई यांनी देहू रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून देहू रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना रविवारी (५ ऑक्टोबर) घडली, अशी माहिती देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे.

असे प्रकार दरवर्षी घडतात. घटनेचे गांभीर्य ओळखून महिलेला मारहाण करणाऱ्याला आरोपीला तत्काळ अटक केली. अधिक तपास सुरू आहे. – विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक