पुणे : लहान मुलांचा सांभाळ करण्यास ठेवलेल्या केअर टेकर महिलेने घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरून पोबारा केला. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर महिन्यात घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य आंबेगाव बुद्रुक येथील दळवीनगरमध्ये राहण्यास आहे. दोघेही नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडतात.
सकाळी गेल्यानंतर ते सायंकाळी घरी परत येतात. त्यामुळे त्यांनी मुलांचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेला नोकरीस ठेवले होते. काही दिवस ती महिला नोकरीस आली. परंतु, तिने तक्रारदार व त्यांची पत्नी नोकरीस गेल्यानंतर कपाटात ठेवलेल्या खणातील (ड्राॅव्हर) २ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरले. हा प्रकार आठ दिवसांनी तक्रारदार यांच्या लक्षात आला. नंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी खडकीमधील पाटील इस्टेट परिसरातील उघड्या दरवाजातून घरात शिरलेल्या चोरट्याने तब्बल २ लाख ८७ हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.