लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगर परिसरात पकडले. धुरपता अशोक भोसले (वय ३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

हडपसर भागात पालखी सोहळ्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली होती. अटकेत असलेल्या भोसलेला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झाली. या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.

आणखी वाचा-गोखले संस्थेच्या कुलपतीपदी अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा भोसले रिक्षातून मुंढव्याकडे गेल्याचे आढळून आले. नगर रस्ता परिसरात ती आली. तेथून ती बसने छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. टाकळी गावातून भोसलेला ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी ही कारवाई केली.