पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात ब्रेक निकामी झाल्याने भरधाव कंटेनरने एकापाठोपाठ २५ वाहनांना धडक दिली. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. खोपोली (एक्झिट) येथील नवीन बोगदा ते फूड माॅल दरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अनिता सहदेव एखंडे (वय ५५, रा. पाडोळी, धाराशिव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. भरधाव कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका छोट्या बसला धडक दिली. त्यातील काही प्रवासी जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-खंडाळा परिसरामध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरचे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यानंतर कंटेनरने एकापाठोपाठ २० ते २५ वाहनांना धडक दिली. अपघातात वेगवेगळ्या वाहनांमधील २१ जण जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची माहिती मिळताच खोपोलीतील हेल्प फाउंडेशन, खंडाळा बोरघाट पोलीस, आयआरबी, डेल्टा फोर्स, तसेच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खोपोली, तसेच नवी मुंबईतील कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.