पिंपरी : दूध विक्री रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे दाखल झालेला खटला न्यायालयात न पाठविण्यासाठी आणि दंड न भरण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना महिला पाेलीस शिपाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून  पकडले. लाचेची रक्कम घेऊन पळून जात असताना ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) पिंपरी न्यायालया समोरील रस्त्यावर करण्यात आली. 

रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच स्वीकारणा-या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे. नाईकरे या भाेसरी पाेलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली हाेती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची दुध डेअरी आहे. ही डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. यामुळे तक्रारदार यांच्यावर भाेसरी पाेलीस ठाण्यात खटला दाखल झाला आहे. तो खटला न्यायालयात न पाठवता आणि कोणताही दंड न भरण्यासाठी पाेलीस शिपाई नाईकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दाेन हजार रूपयांची मागणी केली हाेती. याबाबत डेअरी चालकाने ४ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाईकरे यांनी भाेसरी पाेलीस ठाण्याच्या परिसरात तडजाेडीअंती एक हजार रूपयांची लाच स्वीकारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचेची रक्कम घेऊन पळून जात असनाताच पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. पाेलीस शिपाई नाईकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते.  दरम्यान, नागरीकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.