नारायणगाव : आंबेगाव तालुक्यातील पारगावमधील चिचगाईवस्ती येथे बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून महिला बचावली. अश्विनी शिवाजी ढोबळे (वय २९) या लघुशंकेसाठी गेल्या असताना बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली. अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याचा पंजा स्वेटरमध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले. या हल्ल्यातून ढोबळे बचावल्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या धक्क्याने त्या काहीवेळ बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तत्काळ पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
मंचर येथील वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात जाऊन ढोबळे यांची भेट घेतली. घटनास्थळी पिंजरा लावला आहे. या घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, भीमाशंकर कारखाना संचालक माउली आस्वारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी ढोबळे यांच्या घरी जाऊन विचारपूस केली.
‘५०० ते ७०० बिबटे लवकरच स्थलांतरीत’
आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांतील बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी पुढील सहा महिन्यांत ५०० ते ७०० बिबटे गुजरात येथील वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती माजी खासदार, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी आढळराव पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपाचे प्रवक्ते वसंत जाधव, आशा बुचके, नाथा शेवाळे, वन विभागाचे सचिव म्हैसकर आदी उपस्थित होते.
‘ठिकठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सायरन सिस्टम बसविले जाणार आहेत. बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्री यांना भेटणार आहे. बिबट सफारी पार्कला परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत’, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
‘पिंजरे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी वितरीत करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीला नाईक यांनी सकारात्मकता दर्शविली आहे’, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.
