पिंपरी : महिलेने लग्नासाठी नकार दिल्याने मित्राने महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (२५ जुलै) रात्री दहाच्या सुमारास चाकण येथील नाणेकरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेशसिंग शिवकुमार (मनिंदरगड, कोरिया, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मित्र आरोपी शिवकुमार याला लग्नाला नकार दिला होता. त्या कारणावरून त्याने फिर्यादीच्या घरी येऊन ‘तू माझ्याशी लग्न करत नाहीस! आत्ताच तुला जीवे मारतो!’ असे बोलून, फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर त्यांना उचलून दुसऱ्या मजल्याच्या पॅसेजवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या मांडीचे हाड, बरगडी आणि पाठीचा मणका फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

चिखलीत कोयताभाईची दहशत

जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने कोयत्याने धाक दाखवून २५ हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि दहशत निर्माण केल्याची घटना चिखली येथील टॉवरलाईन येथे घडली.या प्रकरणी धनंजय धोंडिबा मावळे (वय ३०, म्हेत्रे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दत्ता कुदळे (वय २३, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय आणि त्यांचा मित्र स्वप्नील वंजारी बाहेरून फिरून आल्यानंतर टॉवर लाईन येथे त्यांची मोटार पार्किंग करत असताना राहुल तिथे आला. त्याने आदल्या दिवशी म्हेत्रे गार्डन येथे झालेल्या भांडणाचा राग मनात धरून धनंजयच्या मोटारीच्या मागच्या बाजूला मोठा दगड मारला, त्यामुळे काच फुटली. त्यानंतर धनंजयला त्याच्याकडील कोयता दाखवून मारण्याची धमकी दिली. त्याच्या मोटारीत डॅशबोर्डवर ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. तेथे जमलेल्या लोकांना भीती दाखवत त्याने हातातील कोयता हवेत फिरवला आणि धनंजयच्या मोटारीसमोर पार्क केलेल्या मोटारीवर दगड मारून तिचीही काच फोडली. शेवटी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करून तो दुचाकीवरून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

हद्दपारीचा आदेश मोडून सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई निगडी येथील आयटीआय कॉलेजजवळ करण्यात आली.

आदित्य उर्फ भाव्या किशोर बावीस्कर (वय २३, ओटास्किम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अजित सानप यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याला पिंपरी- चिंचवड पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याने कुठलीही परवानगी न घेता तो शहरात आला. त्याने स्वतःकडे लोखंडी कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

खेडमध्ये गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (२६ जुलै) सायंकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली. मोतीराम भैवरु रामदेवासी (४०, सावरदरी, खेड. मूळगाव राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपड शरद खैरे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला आणि तंबाखूजन्य पदार्थ ग्राहकांना विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मोतीराम याच्या ताब्यातून २० हजार ४५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.