साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ‘स्त्रीसाहित्याचा मागोवा’ या प्रकल्पातील चौथ्या खंडाचे शनिवारी (१२ डिसेंबर) शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या खंडामध्ये २००१ ते २०१० या दशकातील मराठी साहित्यातील विविध प्रवाहांचा वेध घेण्यात आला असून त्याद्वारे एक हजारांहून अधिक लेखिकांच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या तीन खंडांमध्ये १८५० ते २००० या कालावधीतील मराठीतील स्त्रीसाहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे. ग्रामीण, शहरी, निमशहरी, महानगरीय, दलित, आदिवासी अशा विविध प्रवाहांतील स्त्रीसाहित्य या खंडामध्ये समाविष्ट आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र खंड कारावा लागणे ही वस्तुस्थिती लेखिकांचे वाढते संख्याबळ आणि स्त्रीसाहित्याचे लोकशाहीकरण याचे द्योतक असल्याचे या खंडाच्या संपादक डॉ. मंदा खांडगे आणि डॉ. नीलिमा गुंडी यांनी दिली. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आफळे आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. कल्याणी दिवेकर या वेळी उपस्थित होत्या.
स्त्रीवादाने वैचारिकदृष्टय़ा नांगरलेली भूमी या विपुल साहित्यनिर्मितीमागे आहे. जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर बदललेल्या सामाजिक वास्तवाची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातील नवे पेच, युद्ध-दहशतवाद, धार्मिक उन्माद, पर्यावरणविषयक चिंता अशा समस्याग्रस्त वास्तवाचा स्त्रीच्या परिप्रेक्ष्यातून घेतलेला वेध यातून लक्षात येतो. हा ग्रंथ साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, भाषांतरशास्त्र या ज्ञानशाखांचे विद्यार्थी आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले उपस्थित राहणार आहेत.
स्त्री साहित्य संमेलन
मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून रविवारी (१३ डिसेंबर) स्त्री साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रतिभा रानडे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. ल. म. कडू यांचे हस्तालिखितांचे प्रदर्शन, ‘माझा लेखनप्रवास’ याअंतर्गत छाया कोरेगावकर आणि नीलम माणगावे यांचे मनोगत, प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्याशी मुक्त संवाद असे कार्यक्रम होणार आहेत. डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘संशोधन क्षेत्रापुढील आवाहने’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. श्यामला वनारसे, स्वाती गोळे आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा सहभाग आहे. डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रुचिर कुलकर्णी यांचा सहभाग असलेल्या गोनीदांच्या ‘पडघवली’ या कादंबरीच्या अभिवाचनाने संमेलनाचा समारोप होणार आहे.