पुणे : वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि शहरीकरणाच्या रेट्यात हरवलेले झरे, ओढे-नाले आणि गमावलेली स्वच्छ हवा यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश देत शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने वृक्षारोपण आणि जनजागृतीचे उपक्रम राबवून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पुणे महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते नदीकाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यानात रोपांचे वाटप करण्यात येत असून, १४ ऑगस्टपर्यंत विविध झाडांची रोपे पाच रुपयांत देण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. अशोक घोरपडे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने तुळस व औषधी वनस्पतींच्या सुमारे ३,१०० रोपांचे आणि ‘पर्जन्यजल’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस गणेश सातपुते, रवी सहाणे, रमेश जाधव या वेळी उपस्थित होते. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने ‘पर्यावरण जनजागृती दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, सुदर्शना त्रिगुणाईत, कल्पना थोरवे, श्रीकांत पुजारी या वेळी उपस्थित होते.

क्रेडाई आणि पुणे मेट्रोच्या वतीने हडपसर येथे वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली. शहरात सुमारे २५,००० झाडे लावण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन यांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले. आयएमए पुणे आणि मायक्रोलॅब फार्मा यांच्या वतीने तळजाई टेकडी येथे २० देशी आणि औषधी वनस्पतींची रोपे लावण्यात आली. आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. संजय पाटील, डॉ. रणजित घाटगे या वेळी उपस्थित होते. बारामती नगर परिषद आणि ‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लास्टिक प्रदूषणावर जनजागृती

‘सम्यक’तर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे ‘कट द एक्स्क्यूज, कट द प्लास्टिक’ या संकल्पनेवर छायाचित्र प्रदर्शन, पर्यावरण संवर्धनासाठी स्वाक्षरी असे उपक्रम राबविण्यात आले. आनंद पवार, मेघा यादव, विशाखा काळे, शुभम पांडव, वैष्णवी पाटील या वेळी उपस्थित होते.