लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले आणि जागतिक वारसास्थळ असलेले लोणार सरोवर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. सरोवर प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांमुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले असून, या सरोवरात सोळा प्रकारच्या प्लॅस्टिक सूक्ष्म कणांचे अस्तित्व असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

लोणार सरोवरातील प्रदूषणाचा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबईतील महाराष्ट्र कॉलेज यांनी केला. प्रा. सचिन गोसावी आणि प्रा. समाधान फुगे यांचा संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध एन्व्हॉयर्न्मेंटल सायन्स अँड पोल्यूशन रीसर्च या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. लोणार सरोवरात अत्यंत दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा जिवाणू, शैवालांचे अस्तित्त्व लाखो वर्षांपासून टिकून आहे. मात्र प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक सूक्ष्मकणांमुळे जागतिक वारसास्थळ असलेल्या सरोवराचे सौंदर्य, संरचना आणि पर्यटन धोक्यात आले आहे. तसेच नैसर्गिक तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

आणखी वाचा- अंमली पदार्थ तस्करांकडून दोन कोटी २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त

लोणार सरोवर परिसरातील सीतान्हाणी या पवित्र कुंडात स्नान करण्यासाठी यात्रेकरूंचा मोठ्या प्रमाणात सरोवर परिसरात वावर असतो. सरोवरात सोळ्या प्रकारच्या सूक्ष्म प्लॅस्टिक कणांचे अस्तित्त्व आढळून आले. तसेच सरोवरातील प्लॅस्टिक सूक्ष्मकणांचा प्रसार आणि आकार पाण्याच्या सामूप्रमाणे बदलत असल्याचे निदर्शनास आले. सरोवरातील वाढत्या प्रदूषणामुळे सरोवरातील जीवसृष्टी आणि जैवरासायनिक प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे, असे प्रा. फुगे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लॅस्टिक प्रतिबंधाची आवश्यकता

लोणार सरोवर परिसरात येणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी प्लॅस्टिक प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम या संदर्भात जागरूकता अभियान राबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी शासन आणि वन विभागाने समन्वयातून सरोवर परिसरात प्लॅस्टिकच्या वापराला योग्य तो प्रतिबंध घातला पाहिजे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.