‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’चा विक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ने जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून विश्वविक्रमी नोंद केली आहे.

जगभरातील विविध खेळाडूंच्या ५१ हजारहून अधिक संस्मरणीय क्रिकेट वस्तूंचे संकलन पाच हजार चौरस फुटांच्या भव्य गॅलरीमध्ये केलेले आहे. अमेरिकेतील मिआमी येथील ‘वर्ल्ड रेकॉर्ड अकादमी’ने या संग्रहालयाला ‘विश्वविक्रमा’ने सन्मानित केल्याचे संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांनी सांगितले.

सहकारनगर क्रमांक दोनमधील स्वानंद सोसायटी गल्ली येथील गोविंद गौरव अपार्टमेंट येथे असलेल्या संग्रहालयाच्या गॅलरीमध्ये त्या त्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघांच्या कप्तानांची स्वाक्षरी असलेल्या बॅट्स आणि बॉल्स आहेत. शिवाय सर डॉन ब्रॅडमॅन, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, डेसमंड हेन्स, विव्हियन रिचर्ड्स, इम्रान खान, सुनील गावसकर अशा अनेक खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य आहे. त्याबरोबरच विश्वचषक सामने विजेत्या संघाच्या आणि टी-२० विश्वचषक सामन्यांच्या प्रत्येक खेळाडूची स्वाक्षरी असलेल्या वस्तू येथे आहेत. या संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४५० खेळाडूंनी भेट दिली असून सध्या हयात नसलेल्या नामवंत खेळाडूंच्या दुर्मीळ क्रिकेट साहित्याचे येथे संकलन आहे. ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ने आपल्याकडील संग्रहित वस्तूंच्या बळावर लंडनचे लॉर्ड्स क्रिकेट संग्रहालय, ऑस्ट्रेलियातील द ब्रॅडमॅन संग्रहालय, ग्रेनाडामधील वेस्ट इंडीज क्रिकेट हेरीटेज सेंटर, न्यूझीलंड क्रिकेट संग्रहालय या संग्रहालायांना मागे टाकले आहे.

पाटे म्हणाले,की जागतिक स्तरावर मिळालेल्या या मान्यतेमुळे आता भारतातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये असे संग्रहालय सुरू करायचे असून त्याची सुरुवात मुंबईपासून करणार आहे. क्रिकेट खेळला जातो त्या सर्व देशांमध्येही असे संग्रहालय उभारण्याचा मानस आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds largest cricket museum dd
First published on: 05-03-2021 at 01:29 IST