लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आयुष्य लाल मातीत घालवलेल्या पैलवानाचा शेवटही लाल मातीतच झाल्याची दुर्देवी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील स्वप्निल पाडाळे या मल्लाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. स्वप्निल अवघ्या ३१ वर्षांचा होता. स्वप्निल पाडाळे हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातून घडलेला मल्ल होता. महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबही त्याने पटकावला होता.

आज सकाळी ७.३० वाजता पुण्यातील मारुंजी इथल्या कुस्ती तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्नील हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना स्वप्निल अचानक कोसळला तो पुन्हा उठलाच नाही.

आणखी वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी; माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्निल अचानक खाली कोसळल्याचं पाहाताच तालमीतील इतर जणांनी त्याला उचलले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याआधीच स्वप्निलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्वप्निलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. प्रशिक्षणासाठी त्याने एन.आय. एस. पतियाळा येथून विशेष अभ्यासही पूर्ण केला होता. स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.