गेल्या महिन्यात कोथरूड, बावधन भागात लूटमारीच्या घटना वाढल्या होत्या. विशेषत: सकाळी फिरण्यासाठी निघालेले ज्येष्ठ नागरिक चोरटय़ांचे लक्ष्य ठरले होते. या घटना वाढल्यानंतर तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सराईत चोरटय़ांची माहिती घेण्यास सुरुवात केली. सराईतांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. वेगवेगळ्या भागांतून माहिती गोळा केली जात होती. ही माहिती घेत असताना पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. चोरटे नवखे आहेत आणि त्यांना पैलवानकीचा शौक आहे, अशी ती माहिती होती. ते समजल्यानंतर कोथरूड पोलिसांचा त्यानुसार शोध सुरू झाला.

तपासाचा भाग म्हणून पुणे पोलिसांचे पथक तातडीने कोल्हापूरला रवाना झाले. त्यांनी तेथील तालमींची माहिती घेण्यास सुरुवात केली. चौघेजण पुण्यातून २ डिसेंबर रोजी आले आहेत आणि ते एका तालमीत दाखल झाले आहेत असे पोलिसांना समजले. त्यांनी भाडय़ाने खोली घेतली असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार अशा संशयित चौघांच्या हालचांलीवर लक्ष ठेवले गेले. संशय असलेल्यांबाबत खात्री झाल्यानंतर पोलिसांनी चौघा तरुणांना थेट तालमीत जाऊन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर पैलवानकी करण्यासाठी आणि खुराकाचा खर्च भागवण्यासाठी या चौघांनी लूटमार केल्याची कबुली पोलिसांना दिली अन पोलीसही चक्रावून गेले..

पोलिसांनी चौघांकडून १२० तोळे सोने, दहा मोबाईल संच आणि तीन दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. ६ नोव्हेंबर रोजी नृत्यदिग्दर्शक श्याम पवार हे कात्रज येथील एक कार्यक्रम आटोपून सहकारी तरुणीला सोडण्यासाठी मध्यरात्री सूस रस्ता भागात गेले होते. इमारतीच्या पासून काही अंतरावर या चौघांनी पवार आणि तरुणीला अडवले. पवार यांची दुचाकी चौघांनी ताब्यात घेतली आणि तरुणीची पर्स हिसकावून त्यांनी पोबारा केला. २० नोव्हेंबर रोजी बाह्य़वळण मार्गावर सकाळी फिरण्यासाठी निघालेले प्रशांत दंडवते (वय ५७) यांना धमकावून त्यांच्या अंगठय़ा आणि सोन्याची साखळी असा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी स्मिता कुलकर्णी (वय ६२, रा. कोथरुड) या सकाळी फिरण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लुटण्यात आले. त्यांच्याकडील ७५ हजारांचे दागिने पळवण्यात आले. अशा एकापाठोपाठ लूटमारीच्या घटना घडल्यानंतर कोथरूड पोलीस चक्रावून गेले होते. सराईत चोरटय़ांची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे आणि तपास पथकाने चोरटय़ांची माहिती काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, खबऱ्यामार्फत चोरटय़ांना चौघाजणांची माहिती मिळाली. चोरटे नवखे असून ते पैलवानकीसाठी कोल्हापुरात असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.

[jwplayer ltMcrIEF]

अमर कराडकर (वय २३), कुलदीप वाल्मीकी (वय २३, दोघे रा. उत्तमनगर), भगवान मरगळे (वय २०) आणि नीलेश देशमाने (वय २३, दोघेही रा. सुतारदरा, कोथरुड) यांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्यांनी लूटमार केल्याची क बुली दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक त्यांना घेऊन पुण्यात आले. मध्यमवर्गीय कुटुंबातील या चौघांनी लूटमार का केली, याबाबतची चौकशी करण्यात आली. तेव्हा पैलवानकीसाठी आम्हाला पैसे हवे होते. खुराकाचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोथरुड, बावधन भागात सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठांना लक्ष्य करून त्यांना लुटल्याची कबुली त्यांनी दिली. त्याबरोबरच बाह्य़वळण मार्गावर ट्रकचालकांना धमकावून लुटल्याची कबुली त्यांनी दिली आहे, असे नितीन भोसले-पाटील यांनी तपासाबाबतची माहिती देताना सांगितले. पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, विलास जोरी, भालचंद्र िनबाळकर, विनायक पाडळे, सचिन कुदळे यांनी तपासकामी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे म्हणाले, की चौघांची चौकशी करण्यात आली. अमर कराडकरचा विवाह निश्चित झाला होता. रुबाबदार दिसण्यासाठी चौघांनी व्यायाम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने मित्र कुलदीप, भगवान, नीलेश यांच्याबरोबर कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला होता. कुलदीप वाल्मीकीच्या कुटुंबातील काहीजण खासगी व्यावसायिकांकडे अंगरक्षक (बाऊन्सर) म्हणून काम करतात. त्यामुळे त्याने कोल्हापूरला जाण्याचा निर्णय केला होता. पैलवानकीचा शौक करण्यासाठी त्यांनी लूटमार केली.

नृत्यदिग्दर्शक श्याम पवार यांची दुचाकी चोरटय़ांनी लांबवली होती. ही दुचाकी त्यांच्या मित्राची होती. दुचाकी चोरीला गेल्यानंतर पवार यांनी मित्राला भरपाई देण्याचे मान्य केले होते. त्यांनी थोडेफार पैसेही मित्राला दिले. चोरटय़ांनी लांबवलेली पवार यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. चोरटय़ांकडून जप्त केलेली दुचाकी पाहून पवार यांनी पोलिसांचे आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांना लुटल्यानंतर ते घाबरतात. तक्रारी दाखल होत नाहीत. त्यामुळे या चौघांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले होते. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी लूटमारीचे एकापाठोपाठ एक गुन्हे केले होते. वारजे आणि हिंजवडी भागांत त्यांनी लूटमारीचे सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

[jwplayer a1LQnDt7]