संयुक्त पूर्व परीक्षा २०२०बाबत उमेदवारांचा आक्षेप

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र राज्य अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या अंतिम उत्तरतालिकेवरही उमेदवारांचा आक्षेप असून, अंतिम उत्तरतालिकेतील काही उत्तरे चुकली असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

एमपीएससीकडून उत्तरतालिकेवर उमेदवारांकडून हरकती मागवण्यात येतात. त्यानंतर या हरकती संकलित करून तज्ज्ञांसमोर ठेवून त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाने अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. या ट्विटरला उमेदवारांनी उत्तरतालिकेत चुका असल्याचा प्रतिसाद नोंदवला.

चुका काय?

उदाहरणार्थ, गौताळा हे राष्ट्रीय उद्यान असल्याचे उत्तरतालिकेत नमूद करण्यात आले आहे. पण गौताळा हे अभयारण्य असल्याने राष्ट्रीय उद्यान हे उत्तर चुकीचे ठरते असे उमेदवारांचे म्हणणे आहे. असाच प्रकार काही अन्य प्रश्नांबाबतही झाला आहे.

उमेदवारांची मागणी..

आयोगाने आधीच्या उत्तरतालिकेतील उत्तरे बदललेली नाहीत. मग पहिली उत्तरतालिका आणि अंतिम उत्तरतालिका करण्याचा उपयोग काय, असा उमेदवारांना प्रश्न आहे. प्रत्येक उमेदवारासाठी एक-एक गुण महत्त्वाचा असतो. त्यामुळे आयोगाने अंतिम म्हणून प्रसिद्ध केलेल्या या उत्तरतालिकेत बदल करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

संयुक्त पूर्वपरीक्षा २०२१ च्या अर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करण्यास एमपीएससीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून चलनाची प्रत घेण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि चलनाद्वारे परीक्षा भरण्यासाठी १ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

प्रसिद्ध केलेली उत्तरतालिका अंतिम आहे. आता या संदर्भात निवदने विचारात घेतली जाणार नसल्याचे उत्तरतालिकेमध्येच स्पष्ट करण्यात आले आहे.

सु. ह. उमराणीकर, सहसचिव, एमपीएससी