पुणे : सदनिकेत किटक नाशक फवारणी केल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील एका सोसायटीतील सदनिकेत ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
रवींद्र बबन जाधव (वय २६, रा. इंदापूर, जि. पुणे ) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी असून, तो सध्या सोलापुरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोर एका सोसायटीत राहणाऱ्या मित्राकडे आला होता. त्याचा मित्र सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मंगळवारी तो सदनिकेत झोपला होता. त्याने सदनिकेचा दरवाजा बंद केला होता. दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत सदनिकेत किटक नाशक फवारणी (पेस्ट कंट्रोल) केल्याची माहिती मिळाली. विषारी वायुमुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.