पुणे : लोणावळा परिसरात पादचारी तरुणीला धमकावून तिच्यावर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
याबाबत पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील तुंगार्ली गाव परिसरातून तरुणी शुक्रवारी सायंकाळी निघाली हाेती. पीडित तरुणीला मोटारीतून आलेल्या तिघांनी धमकावले. तिला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले. तिचा मोबाइल संच हिसकावून घेतला. त्यानंतर तरुणीचे हात-पाय बांधले. तरुणीला मोटारीतून वेगवेगळ्या भागांत नेण्यात आले. मोटारीत तिच्यावर तिघांनी बलात्कार केला, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तरुणीला नांगरगाव परिसरात सोडून मोटारीतून आरोपी पसार झाले. तेथे घाबरलेल्या अवस्थेत तरुणी थांबली हाेती. स्थानिक रहिवाशांनी तरुणीला जवळच्या एका मंदिरात सुरक्षित नेले. त्यानंतर रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करून जबाब नोंदवला.
पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी लोणावळा पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, आठवड्यापूर्वी पवना धरण परिसरातील एका गावातून निघालेल्या पादचारी विवाहित महिलेला धमकावून तिच्यावर दुचाकीस्वाराने बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.