scorecardresearch

विवाहेच्छुक युवती आमिषांच्या जाळय़ात

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख अनेक युवतींना महागात पडली आहे.

विवाहेच्छुक युवती आमिषांच्या जाळय़ात
प्रतिनिधिक छायाचित्र

शहरातील ९४ युवतींची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर बनावट नावाने विवाहेच्छुक युवतींशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी शहरातील ९४ युवतींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचे उजेडात आले आहे. विवाह नोंदणी संकेतस्थळावर (मेट्रोमॉनिएल साइट) अनेक युवक युवती नोंदणी करतात. ते प्रामुख्याने उच्चशिक्षत आहेत. युवकांच्या तुलनेत विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून युवतींची फसवणूक होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे निरीक्षण सायबर गुन्हे शाखेने नोंदवले आहे.

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख अनेक युवतींना महागात पडली आहे. बाणेरमधील एका युवतीला विवाहाच्या आमिषाने सायबर चोरटय़ांनी २४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी करणारे चोरटे उच्चशिक्षित असल्याची बतावणी करतात.

 खासगी कंपनी, शासकीय विभागात उच्चपदस्थ अधिकारी तसेच परदेशातील कंपनीत अधिकारी असल्याची बतावणी केली जाते. विवाहेच्छू युवतींची फसवणूक करण्यासाठी चोरटे बनावट नावाने संकेतस्थळावर नोंदणी करतात.

चोरटे संकेतस्थळावर दुसऱ्या व्यक्तीचे छायाचित्र वापरतात. सुरुवातीला चोरटे ओळख वाढवितात. समाजमाध्यमावर संवाद वाढल्यानंतर चोरटे युवतींना जाळय़ात ओढतात. त्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन युवतींकडून पैसे उकळतात. गेल्या वर्षी विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून शहरातील ९४ युवतींची फसवणूक झाली असून त्यांच्याकडून चोरटय़ांनी लाखो रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘समुपदेशन, संवाद, माहितीची पारदर्शकता महत्त्वाची’

अनुरूप विवाह संस्थेचे संचालक तन्मय कानिटकर म्हणाले, ऑनलाइन माध्यमातून विवाह ठरवताना होणाऱ्या फसवणुकींबाबत जनजागृतीसाठी अनुरूपचा सातत्याने प्रयत्न असतो. विवाह विषयक संकेतस्थळांवरून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संकेतस्थळांकडून नाव नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक होणे ही यातील प्रमुख बाब आहे. अनुरूपमध्ये नाव नोंदणीसाठी आम्ही विवाहेच्छुच्या मूळ कागदपत्रांचा आग्रह धरतो. नाव नोंदणी करणाऱ्या उमेदवारांशी आमचा सातत्याने संपर्क असतो. कुटुंबविषयक माहिती, उत्पन्न, आर्थिक परिस्थिती विषयक इत्यादी माहिती अनुरूपमधील खात्यामध्ये अपलोड करण्याविषयी आमचा आग्रह असतो. तसेच, विवाहेच्छु तरुण-तरुणींनी केवळ वैयक्तिक संपर्क ठेवण्यापेक्षा लवकरात

लवकर आपल्या कुटुंबीयांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याविषयी आम्ही सुचवतो. काही विशिष्ट खात्यांवरून संशयास्पद हालचाली होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आमचे संकेतस्थळ पुरेसे अद्ययावत ठेवतो. या प्रक्रियेत समुपदेशन, संवाद आणि तांत्रिक तसेच माहितीची पारदर्शकता महत्त्वाची आहे.

भेटवस्तूच्या आमिषाने १८३ महिलांची फसवणूक

गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमावर महिलांना मैत्रीची विनंती पाठवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. परदेशातील खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करून चोरटे महिलांना जाळय़ात ओढतात. परदेशातून महागडय़ा भेटवस्तू पाठविण्यात आल्या असून विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) त्या पकडल्या आहेत, अशी बतावणी चोरटय़ांकडून केली जाते. भेटवस्तू सोडविण्यासाठी तातडीने रक्कम भरावी लागेल, असे सांगून चोरटे महिलांकडून पैसे उकळतात. गेल्या वर्षी शहरातील १८३ महिलांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली.

देशभरातील २५५ युवतींना गंडा; आरोपी अटकेत

विवाहाच्या आमिषाने पुणे, बंगळुरु, गुरुग्राममधील २५५ युवतींची फसवणूक करणाऱ्या निशांत रमेशचंद नंदवान (वय ३३) आणि विशाल हर्षद शर्मा (वय ३३, दोघे मूळ रा. राजस्थान) यांना नुकतीच अटक करण्यात आली. नंदवान, शर्मा यांनी केंद्र शासनाच्या वेगवेगळय़ा विभागात उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करून युवतींची फसवणूक केली होती.

सायबर चोरटय़ांकडून विवाहाचे आमिष, परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिष आदी प्रकारातून सामान्यांची फसवणूक केली जाते.  हे  प्रकार वाढीस लागले आहेत. समाजमाध्यमावर तसेच विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद वाढल्यास खातरजमा करणे गरजेच आहे.

डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा, पुणे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 02:00 IST

संबंधित बातम्या