पुणे : जगभरात ई-सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, सुमारे १० कोटींहून अधिक जणांना याचे व्यसन आहे. त्यापैकी १३ ते १५ वयोगटातील तब्बल दीड कोटी मुलांना हे व्यसन असल्याची धक्कादायक बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. हा आकडा केवळ विदा संकलित होत असलेल्या देशांतील असल्याने प्रत्यक्षात हे प्रमाण अनेक पटीने जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच जगातील ई-सिगारेटच्या वापराबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यातून समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत. जगभरात १० कोटींहून अधिक नागरिक ई-सिगारेटचे व्यसन करतात. त्यातील सुमारे ८.६ कोटी नागरिक हे श्रीमंत देशांतील आहेत. जगभरात १३ ते १५ वयोगटातील सुमारे १.५ कोटी मुले ई-सिगारेटचा वापर करतात. ई-सिगारेटची विदा संकलित होणाऱ्या देशांमध्ये प्रौढांपेक्षा मुले ही सरासरी नऊपट अधिक ई-सिगारेट पितात.
तंबाखू उद्योगांकडून नवनवीन उत्पादने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सादर केली जात आहेत. तंबाखूचे व्यसन वाढवून या बाजारपेठेचा विस्तार करणे, हा यामागील हेतू आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकारही तंबाखू उद्योगाकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ नवीन प्रकारच्या सिगारेटच नव्हे तर ई-सिगारेट, निकोटिन पाऊच, हिटेड टोबॅको प्रॉडक्ट्स (एचटीपीएस) अशा प्रकारच्या नवीन उत्पादनांचा समावेश आहे. तरुण पिढीसह पौगंडावस्थेतील मुलांना भुरळ पाडण्यात ही उत्पादने यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातूनच या उत्पादनांचा वापर वाढत आहे.
निकोटिनच्या व्यसनाची एक नवीन लाट ई-सिगारेटमुळे निर्माण होण्यास मदत होत आहे. ई-सिगारेटमुळे तंबाखूचे दुष्परिणाम कमी होतात, अशी जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात त्यांच्यामुळे अतिशय कमी वयात मुलांमध्ये निकोटिनचे व्यसन जडत आहे. नवीन पिढीच्या आरोग्यासाठी हे अतिशय घातक आहे. – एटिएन क्रूग, संचालक, जागतिक आरोग्य संघटना
पाचपैकी एका व्यक्तीला तंबाखूचे व्यसन
जगात तंबाखू सेवनात घट होत असल्याची सकारात्मक बाबही जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केली आहे. संघटनेने म्हटले आहे की, जगभरात २००० मध्ये १.३८ अब्ज नागरिक तंबाखू सेवन करीत होते. ही संख्या २०२४ मध्ये १.२ अब्जांवर आली. जगात २०१० पासून तंबाखू सेवन करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत १२ कोटी म्हणजेच २७ टक्क्यांची घट झाली आहे. असे असले तरी जगातील पाचपैकी एका व्यक्तीला तंबाखूचे व्यसन आहे.