पुणे : दहशत माजविण्यासाठी अल्पवयीनांकडून दुचाकीस्वार तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना विमाननगर भागातील खेसे पार्क परिसरात घडली. टोळक्याने तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींची तोडफोड केली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुण २९ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास भावासाेबत दुचाकीवरुन निघाला होता. लोहगाव भागात खेसे पार्कजवळ टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या परिसरातील तीन रिक्षांच्या काचा फोडल्या; तसेच परिसरातील एका सोसायटीच्या आवारात लावलेल्या पाच दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.
वानवडी भागात शिंदे वस्ती परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली. टोळक्याने एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. शहरात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्याकडून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरुन वादातून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तोडफोड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
