पुणे : दुचाकीची चावी न दिल्याने झालेल्या वादातून एकाने छातीत ठोसा मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी लोहियानगर भागात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सूरज नंदू सकट (वय २४, रा. लोहियानगर) याला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि सूरज हे नातेवाईक आहेत. दोघे जण मजूरी करतात. दुचाकीची चावी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने सागरच्या छातीत ठोसा मारला. ठोसा मारल्यानंतर सागर बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतील सागरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. खडक पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून सूरज याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

मैत्रिणीला त्रास दिल्याने अल्पवयीनाला मारहाण

मैत्रिणीला त्रास दिल्याने अल्पवयीनाला मारहाण करून त्याला मोटारीतून ढकलून देण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. याबाबत एका १७ वर्षीय युवकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहेे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक हा वारजे भागातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी आणि त्याचा साथीदाराने त्यांच्या मैत्रिणीला युवक त्रास देत असल्याच्या कारणावरून मोटारीतून अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी युवकाला मोटारीतून बाहेर ढकलून दिले. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करत आहेत.

धनकवडीत टोळक्याची दहशत

उसने घेतलेले पैसे परत न केल्याने टोळक्याने दहशत माजवून महिला, तसेच तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धनकवडीत घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी रोहन सचिन यादव (वय २२, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, धनकवडी), अंगद अशोक साठे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांसह चार अल्पवीयनांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीत राहायला आहे. महिलेच्या पतीने उसने घेतलेल्या पैशांवरून आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपी यादव, साठे आणि साथीदार हे कोयते घेऊन शंकर महाराज वसाहतीत आले. आरोपींनी दहशत माजवून महिला, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ केली. दहशत माजवून पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.