पुणे: वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने लातूरमधून अटक केली. कात्रज बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी स्मशानभूमी परिसरात ही घटना घडली होती.

आसिफ युुनूस शेख (वय २५, रा. गल्ली क्रमांक पाच, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हनीफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. १० मे रोजी हनीफ शेख हा हांडेवाडी-होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत मृतावस्थेत सापडला होता. त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत हनीफच्या भावाने फिर्याद दिली होती.

हनीफच्या खुनामागचे कारण समजू शकले नव्हते. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि सहाकडून समांतर तपास करण्यात येत होता. पोलिसांनी बाह्यवळण मार्ग परिसरातील ५० ते ६० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. हनीफ आणि आसिफ यांच्यात वाद झाले होते. वादातून हनीफने त्याला दोन ते तीन वेळा मारहाण केली होती. आसिफ त्याच्यावर चिडून होता.

१० मे रोजी दोघे जण हांडेवाडी स्मशानभूमीजवळ गेले होते. तेथे हनीफने दारू प्यायली. दारूच्या नशेत असलेल्या हनीफने आसिफशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये झटापट झाली. आसिफने हनीफच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर आसिफ लातूरला पसार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून लातूरमधून अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, सहायक फौजदार राजस शेख, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले यांनी ही कामगिरी केली.