घरी केलेल्या पोळ्या शिल्लक राहिल्या की, जवळपास प्रत्येक गृहिणीला ‘आता या शिळ्या पोळ्यांचे काय करायचे,’ असा मोठा गहन प्रश्न पडलेला असतो. कारण- आदल्या दिवशीच्या आणि कोरड्या झालेल्या पोळ्या खाणे कुणालाच पसंत पडत नाही. मग उरलेल्या पोळ्या मोजून, त्यांची फोडणीची पोळी, पोळीचा चुरा, असे पदार्थ नाश्त्यासाठी बनवले जातात.

अगदीच एक किंवा दोन पोळ्या उरल्या असतील, तर त्यांचे सरळ बारीक तुकडे करून, पक्षी किंवा प्राण्यांना खाण्यासाठी दिल्या जातात. परंतु, या शिळ्या पोळ्यांपासून आपण एक अतिशय भन्नाट आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवू शकतो. उन्हाळा आता जवळपास संपत आलेला आहे. असे असताना पावसाळ्यात तुम्ही हा पदार्थ अगदी हमखास बनवू शकता. हा पदार्थ म्हणजे ‘पोळीची कुरकुरीत भजी’. यूट्यूबवरील Maharashtrian_Recipes_Latika नावाच्या चॅनेलने ही भन्नाट आणि झटपट तयार होणारी रेसिपी शेअर केली आहे. नेमकी ही पोळीची भजी कशी बनवायची, त्याचे साहित्य काय पाहू या.

हेही वाचा : Recipe : झटपट तयार होणारा चटपटीत कैरीचा तक्कू! पाहा १० मिनिटांत तयार होईल हा उन्हाळी पदार्थ

पोळीची कुरकुरीत भजी रेसिपी

साहित्य

२ पोळ्या
१ कांदा
कोथिंबीर
आले
लसूण
हिरव्या मिरच्या
धणे-जिरे पावडर
जिरे
तिखट
हळद
हिंग
ओवा
दीड चमचे डाळीचे पीठ
१ चमचा तांदळाचे पीठ
१ चमचा तीळ
मीठ

कृती

  • सर्वप्रथम एक तवा तापत ठेवावा. त्यावर चमच्याने थोडेसे तेल पसरून घ्या.
  • आता तवा गरम झाल्यावर त्यावर शिळ्या पोळ्या हलक्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झालेल्या पोळ्यांचे हातांनी बारीक तुकडे करा.
  • आता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घ्या.
  • चिरलेल्या कांद्याचे तुकडे बारीक केलेल्या पोळ्यांमध्ये घालावेत.
  • त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा या मिश्रणात घालावी.
  • आता चवीसाठी यामध्ये १ चमचा धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, किंचित हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
  • शेवटी आले-मिरची-लसूण यांचा ठेचा, थोडा ओवा, जिरे आणि डाळीचे पीठ व तांदळाचे पीठ घालून, सर्व मिश्रण हाताने कालवून घ्यावे.
  • भजीचे हे पीठ एकजीव होण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालावे. मात्र, हे मिश्रण पातळ करू नये.
  • भजी तयार होत असताना सर्वांत शेवटी एक चमचा तीळ टाका.
  • आता एका कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल तापवत ठेवा.
  • तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये पोळीच्या भजीच्या पिठाचे छोटे किंवा मध्यम आकाराचे गोळे करून सोडावेत.
  • भजी खरपूस सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्यावीत.
  • भजी कुरकुरीत झाल्यानंतर, ती एका बाऊलमध्ये काढून घ्यावीत.
  • तयार झालेली पोळीची कुरकुरीत भजी, गरमागरम असताना चटणी किंवा सॉससह खाण्यास घ्यावी.

व्हिडिओ पाहा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरलेल्या पोळ्यांपासून अशी कुरकुरीत भजी कशी बनवायची याची भन्नाट आणि सोपी रेसिपी यूट्यूबवरील @Maharashtrian_Recipes_Latika नावाच्या चॅनेलने शेअर केली आहे.