अनेकदा आपल्याला नाष्ट्याला टेस्टी आणि हेल्थी एकाच वेळी दोन्ही हवं असतं, मात्र ते नेहमीच शक्य नसतं. आहारातही पौष्टिक पदार्थांच्या आपण शोधात असतो. अशावेळी आहारात समावेश करताना आपण आधी कडधान्यांचा पर्याय निवडतो. आहारात कडधान्यांचा समावेश असायला हवा असं नेहमी सांगितलं जातं. म्हणूनच थोडा वेगळा आणि प्रोटीनयुक्त नाश्ता करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्या ब्रेकफास्टसाठी घेऊन आलोय परफेक्ट हेल्थी रेसिपी. तुमच्या ब्रेकफास्टसाठी मसूर डाळ वडा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. मसूर डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमचे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात. याशिवाय मसूरचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे हे मसूर डाळ वडे.

मसूर डाळ वडा साहित्य –

1 वाटी मसूर डाळ
2 हिरवी मिरची
1 ते 2 चमचे काळी मिरी
1 कापलेला कांदा
4 मोठे चमचे मोहरीचे तेल
4 पाकळ्या लसूण
1 तुकडा आलं
1 चमचा जीरा पावडर
चवीनुसार मीठ
कोथिंबीर

मसूर डाळ वडा कृती –

मसूर डाळ 3-4 वेळा धुवून एका भांड्यात पाणी घेऊन भिजवावी. एक तास डाळ व्यवस्थित भिजू द्या. त्यानंतर पाणी काढून डाळ बारीक करुन घ्या आणि त्यात आले, लसूण, हिरवी मिरची आणि थोडे पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करा. कांदा बारीक चिरुन घ्या आणि बारीक केलेल्या मिश्रणात मीठ, काळी मिरी पावडर, जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर, कांदा घालून मिक्स करा. त्यानंतर नॉन-स्टिक पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. मिश्रणाचे हलक्या जाड स्वरुपात हातावर गोल वडे करुन पॅनमध्ये फ्राय करा. वडे दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा. वडे फ्राय केल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून छान कोथिंबीरीची गार्निशींग करा. अशाप्रकारे आपले पौष्टिक आणि झटपट मसूर डाळ वडे तयार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चला जाणून घेऊया मसूर डाळ खाण्याचे फायदे

  • मसूर खाल्ल्याने कर्करोगासारखे आजार टाळता येतात
  • त्याच्या सेवनाने कर्करोग वाढण्यापासून रोखता येतो.
  • रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसूरचे सेवन करा
  • अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी मसूर डाळ गुणकारी
  • मधुमेहींसाठी मसूर डाळ फायदेशीर
  • मसूर डाळ पचनाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर

तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा