नवीन वर्षात तुम्ही जर पौष्टिक आहार घेण्याचा आणि अरबटचरबट पदार्थ खाणे टाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. कितीही म्हटलं, तरी आपले आवडते पदार्थ खाणे आपण असे एका दिवसात सोडू शकत नाही. अगदी कितीही प्रयत्न केला तरीही काही दिवसांनी पुन्हा आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या पिझ्झा, बर्गर आणि सँडविच यांसारख्या पदार्थांची आठवण येण्यास सुरवात होते.

मात्र कधीतरी तुम्हाला तुमचा संकल्प न मोडता जर असे चमचमीत किंवा वेगळे काही खावेसे वाटत असेल, तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitcenoffical या अकाउंटने शेअर केलेली ही सँडविच रेसिपी नक्की बनवून पाहा. कारण- या सँडविचमध्ये सर्व पौष्टिक पदार्थ असून, ब्रेडचा अजिबात वापर केलेला नाहीय. आहे ना एकदम भन्नाट आणि सोपा उपाय? मग हे सँडविच बनवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात आणि याची कृती काय आहे ते पाहा.

हेही वाचा : Recipe : ‘दही’ वापरून १५ मिनिटांत घरीच बनवा चीज स्प्रेड! काय आहे याची भन्नाट रेसिपी पाहा….

ब्रेड न वापरता सँडविच कसे बनवायचे पाहा

साहित्य

१ गाजर
१ सिमला मिरची
१ कांदा
१ टोमॅटो
१ बीट
१ काकडी
१ हिरवी मिरची
मक्याचे दाणे
कोथिंबीर
अर्धा कप रवा
अर्धा कप पोहे
१०० ग्रॅम दही
चिली फ्लेक्स
मीठ
चीज
बटर

कृती

सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, बीट [सोललेले], सिमला मिरची, काकडी, गाजर आणि एक हिरवी मिरची अशा या सर्व भाज्या अगदी बारीक चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये रवा आणि भिजवलेले पोहे घेऊन, त्यामध्ये थोडे दही घालून एक घट्ट मिश्रण बनवून घ्या. तुम्हाला दही नको असल्यास त्याऐवजी पाण्याचा वापर करू शकता.
तयार मिश्रणात बारीक चिरलेल्या भाज्या, चीज, मीठ आणि चिली फ्लेस्क घालून घेऊन पुन्हा एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यावे.
आता गॅसवर सँडविच मेकर ठेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना बटर लावून घ्या आणि सँडविचचे तयार केलेले मिश्रण त्यामध्ये घालून ८ ते १० मिनिटांसाठी शिजवून घ्या.
तयार आहे तुमचे बिना ब्रेडचे पौष्टिक व्हेज सँडविच. हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@sagarskitcenoffical या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.