कोकणात भाकरीबरोबर आवडीने खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे कुळथाचे पिठले. सिंधुदुर्ग आणि पुढे मालवण, कणकवली या भागांत कुळथाचे पिठले हमखास बनवले जाते. भात आणि बटाट्याच्या तिखट भाजीबरोबर किंवा लोणचे आणि भाताबरोबर कुळथाचे पिठले खाण्याचा एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे मुंबईत राहणारे अनेक कोकणवासीयांकडेही आजही कुळथाचे पिठले तितक्याच आवडीने बनवले जाते; ज्याची चव इतकी भारी असते की, ती एकदा खाल्ल्यानंतर तुम्हालाही ते परत खाण्याची इच्छा होईल. त्यामुळे आपण आज अस्सल मालवणी पद्धतीने खमंग ‘कुळथाचे पिठले’ कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

१) ४ चमचे कुळीथ पीठ (मध्यम आकाराचा चमचा)
२) ५ ते ७ कढीपत्त्याची पाने
३) ३ ते ४ हिरव्या मिरच्या
४) ४ लसणाच्या पाकळ्या
५) कोथिंबीर
६) २ ते ३ तुकडे कोकम
७) २ चमचे तेल
८) १ कांदा
९) टोमॅटो (तुमच्या आवडीनुसार)
१०) किसलेले ओले खोबरे
११) चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून परतून घ्या. मग लगेच कढीपत्त्याची पाने आणि मिरच्यांचे तुकडे घालून चांगली फोडणी द्या. हे सर्व मिश्रण चांगले शिजवून होताच, त्यात कांदा व टोमॅटो घाला. कांदा व टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत त्यात शिजवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या मिश्रणात कुळथाचं पीठ टाकून चांगल्या प्रकारे मिसळून शिजवा. त्यानंतर त्यात पाणी घालून, त्यातील गुठळ्या फुटत नाही तोपर्यंत ढवळत राहा. (एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात कुळथाचं पीठ मिसळून तेही फोडणीत टाकू शकता. अनेक जण अशाच प्रकारे कुळथाचं पिठलं बनवतात.) पण, तुम्ही फोडणीत पीठ चांगले भाजून मग पिठले तयार केल्यास, त्याच्या चवीची खुमारी आणखी वाढते. आता उकळी आली की, त्यात कोकमाचे तुकडे, मीठ व कोथिंबीर घालून एक चांगली उकळी काढा. आता कढई खाली उतरवा आणि त्यावर किसलेले खोबरे घाला. अशा प्रकारे भाताबरोबर खाण्यासाठी गरमागरम कुळथाचे पिठले तयार झालेय.