Non-vegetarian Recipe : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे महाराष्ट्रातील नॉनव्हेजप्रेमींचा हक्कांचा दिवस असतो. अनेक महाराष्ट्रीयन घरात नॉनव्हेजच्या वारी मच्छी, मटण, चिकनचा बेत आखला जातो. यात नेहमी चिकन मसाला, चिकन सुका किंवा मटण बिर्याणी, मटण खिमा पाव, मटण रस्सा, मच्छीचे कालवण, फ्राय मच्छी खाऊन वैताग येतो, अशावेळी एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ खावासा वाटतो. यासाठी आम्ही मटणापासून बनवला जाणारा असा एक पदार्थ घेऊन आलो आहोत, जो एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही त्याची चव विसरणार नाही. आज आपण घरच्या घरी मटण ‘खिमा टोस्ट सँडविच’ कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत. अगदी कमी वेळात बनवून तयार होणारी ही रेसिपी खायला एकदम चविष्ट आणि लज्जतदार असते.
मटण खिमा टोस्ट सँडविच बनवण्याचे साहित्य
मटण खिमा – २५० ग्रॅम
कांदा – १/२ कप
आलं- लसूण- मिरची पेस्ट – २५० ग्रॅम
मिक्स मसाला (घरातील)- १ टीस्पून
हळद – १/२ टीस्पून
तेल -१/२ टीस्पून
बटर – २ टीस्पून
ब्रेड स्लाईस
(मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरा)
मटण खिमा टोस्ट सँडविच बनवण्याची कृती
खिमा धुवून निथळून घ्या. यानंतर त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण-मिरची पेस्ट मिक्स करा. दुसरीकडे कढई गरम करत ठेवा, गरम होताच त्यात कांदा टाका आणि लालसर होईपर्यंत परता. यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला, वाटण घालून परता, आता खिमा घालून सर्व मिश्रण पाच मिनिटे परतून घ्या. यात थोडे पाणी घालून काही मिनिटे चांगलं शिजू द्या. खिमा पूर्ण कोरडा दिसेल अशाप्रकारे शिजला पाहिजे, त्यात पाणी अजिबात ठेवू नका. यानंतर शिजलेला खिमा प्लेटमध्ये काढा आणि प्लेट थोडी तिरकस ठेवा, जेणेकरून त्यातील जास्तीचे तेल काढता येईल.
यानंतर ब्रेड स्लाईसला एका बाजूला थोडे बटर लावून घ्या. बटरची बाजू खाली ठेऊन त्यावर तयार खिम्याचे मिश्रण पसरवा, यानंतर वरती परत एक स्लाईस ठेवा. या स्लाईसची बटर लावलेली बाजूदेखील वर ठेवा.
आता हे सँडविच टोस्ट मेकरच्या मदतीने नीट टोस्ट करून घ्या. अशाप्रकारे तुमचा मटण खिमा टोस्ट सँडविच तयार आहे. तुम्ही मस्त सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तो खाऊ शकता.