हिवाळ्याच्या दिवसात बाजारात ताजे शिंगाडे खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायदेशीर मानले जातात. त्यातील अँटिऑक्सिडंट हा घटक वजन कमी करण्यास मदत करतो. तसेच शरीरातील चयापचय क्षमताही वाढवतो. अनेक जण शिंगाडे कच्चे खातात; पण उकडल्यानंतर त्याची चव आणखी छान लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उकडलेले शिंगाडे खायला आवडत असतील, तर ते घरी कसे बनवायचे याची सोपी पद्धत जाणून घेऊ…
शिंगाडे उकडण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम शिंगाडे पाण्याने पूर्णत: स्वच्छ करा. त्यावरील कचरा निघून जाऊन, ते व्यवस्थित स्वच्छ व्हावेत यासाठी एक-एक शिंगाडा नीट धुऊन घ्या.
कच्च्या शिंगाड्यातील तुरटपणा कमी करून, त्याची चव चांगली लागण्यासाठी त्यात लिंबू घालणे आवश्यक आहे. त्याकरिता एका लिंबूचे चार भाग करून घ्या, त्यानंतर कुकरमध्ये शिंगाडे एक कप पाणी आणि लिंबाचे फोड टाकून कुकर गॅसवर ठेवा.
अशा प्रकारे शिंगाडे खाण्यासाठी तयार
कुकरमध्ये पुरेसे पाणी घाला; जेणेकरून शिटी व्यवस्थित होईल. कुकरच्या तीन वेळा शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा आणि वाफ निघाल्यावर झाकण उघडा. त्यानंतर शिंगाडे बाहेर काढा. आता शिंगाडे थंड पाण्यात टाकून, त्याची साले काढून घ्या. नंतर ते कापून तुम्ही तुमच्या आवडीनुसार, त्यावर मीठ, चाट मसाला टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.