गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे २ जुलै २०१३ रोजी ‘दुष्काळ’ या विषयावर एक चर्चासत्र झाले. त्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी सादर केलेल्या लेखातील पाण्याची उपलब्धता या विषयावरील परिच्छेद खाली उद्धृत केला आहे. ‘जायकवाडी ४० टीएमसीचेच’  या शंकरराव कोल्हे यांच्या गंभीर  विधानासंदर्भात (लोकसत्ता, दि. १६ जुल २०१३) त्याचा विचार व्हावा असे वाटते.
‘ प्रकल्पांचे नियोजन करताना जे विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यानुसार पाणी उपलब्धतेबाबत गृहितके केली जातात. आकलनाच्या मर्यादा असतात. प्रकल्प ‘फीजिबल’ करायचाच असे दडपण असते. शासकीय अनास्था व लाल फीतही काम करत असते. या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून पाणी उपलब्धतेचे अंदाज ठरतात. ते शेवटी अंदाज असतात. ते काही त्रिकालाबाधित सत्य नसते. काळानुरूप त्यात बदल होतात. पण तोपर्यंत प्रकल्प होऊन गेलेला असतो. अमुक एवढे क्षेत्र भिजेल असे गृहीत धरून कामे पूर्ण झालेली असतात. अन आता तेवढे पाणीच खोऱ्यात वा प्रकल्पस्थळी उपलब्ध नाही असे लक्षात येते. सगळेच मुसळ केरात जाते. जायकवाडीचे उदाहरण बोलके आहे. गोदावरी खोऱ्यात पठणपर्यंत १९६ टीएमसीपाणी उपलब्ध आहे असे मानून १०० टी.एम.सी.चा जायकवाडी प्रकल्प उभा राहिला. पण २००४ सालच्या अभ्यासानुसार आता १५६ टीएमसीच पाणी उपलब्ध असे जाहीर झाले. ४० टीएमसी पाण्याची तूट एकटय़ा जायकवाडीवर दाखवली गेली. हे कमी होते की काय म्हणून २००४ सालापर्यंत जायकवाडीच्या वर मात्र अजून ३० टीएमसीची धरणे बांधण्यात आली. म्हणजे जायकवाडीचे पाणी ७० टक्क्यांनी कमी झाले. उरलेल्या ३० टक्क्यांत जायकवाडी कशी पास होणार? अशा रीतीने नापास केलेली जायकवाडी आता जल क्षेत्रातून ‘ड्रॉपआऊट’ होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या जल नियोजनाची ही शोकांतिका जायकवाडीपुरती मर्यादित नाही. ती सार्वत्रिक आहे. मागास, दुष्काळी व नदीखोऱ्यातील शेपटाकडचे भाग त्याचे विशेष बळी आहेत. खोरे/उपखोरेनिहाय पाणी उपलब्धता फक्त नव्याने ठरवणेही पुरेसे नाही. प्रकल्पनिहाय परिस्थिती फार वेगळी असू शकते. जलाशयातील गाळाचे अतिक्रमण; बाष्पीभवन; गळती व पाझर; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेली जल संधारणाची कामे व  विविध कारणांसाठी तेथे होणारा पाण्याचा वापर याचा विचार करून प्रकल्पांचा वास्तववादी आढावा घेणे तितकेच आवश्यक आहे.
 खोरे/उपखोरेनिहाय एकूण पाणी उपलब्धता आणि पूर्ण, अपूर्ण, बांधकामाधीन व भविष्यातील अशा सर्व पाणी योजनांतील प्रत्यक्ष पाणी उपलब्धतेचा लेखाजोखा म्हणूनच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजी व आय.आय.टी.सारख्या तिऱ्हाईत (Third party) संस्थांकडून नव्याने तपासून घेणे महत्त्वाचे आहे. पाणी उपलब्धता हा मूलभूत मुद्दा आहे. त्यातच बदल झाला तर जलविकास व व्यवस्थापनाची सगळी गणिते चुकणार आहेत. किंबहुना, ती चुकली आहेत म्हणूनच आज जलसंघर्ष तीव्र झाला आहे.
– प्रदीप पुरंदरे,
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद

नाचो इंडिया .. नाचो!
महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटा डान्स बारमध्ये नृत्यांगनांवर उडविणाऱ्या राष्ट्रवीरांच्या शिरपेचात मानाचा तुरा.. ‘मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा छमछम सुरू होणार.. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.. राज्य सरकारला धक्का!’ या बातम्या, हे दुर्दैव आहे. न्यायदेवता ही भारतीय तरुण पिढी बेधुंद अवस्थेत थिरकताना पाहू इच्छिते आहे काय?
मला एक गोष्ट कळत नाही.. डान्स बारमध्ये काम करणाऱ्या नृत्यांगना रस्त्यावर येतील.. त्यांचा रोजगार बुडेल अशी ओरड काही जण का करत आहेत? या लोकांना कित्येक कुटुंबांतील बायका, संसार या डान्स बारमुळे रस्त्यावर आले आहेत हे माहीत नाही का? आणि काम नाही असे बोंबलत.. इतरांना विकृतीत नाचविण्यापेक्षा, रोजगार उपलब्ध होतील अशा योजना यांच्यासाठी आमलात आणण्याचा प्रयत्न करा..!
डान्स बारचे समर्थन करणाऱ्यांनी आणखीही एक उत्तर द्यावे.. या डान्स बारसाठी फसवणूक करून मुलींची तस्करी केली जाते.. त्याबद्दल तुमचे मत? का इथेही ते दलाल रस्त्यावर येतील, भिकेला लागतील ही भीती..?
काळा आणि भ्रष्ट पसा विनाकष्ट उडविण्याचे ठिकाण म्हणजे डान्स बार! ही छमछम आपल्या घरात येऊ नये, या शुभेच्छा देण्याखेरीज आता हाती काहीच राहिलेले नाही.
– प्रशांत शिवलाल निगडे, नवी मुंबई</strong>

आता डान्स बारचे ‘नियमन, नियंत्रण व नियोजन’!
प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे, या वाक्यावर जोर देत सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली. मुळात ही बंदी का घातली होती हा प्रश्न आहे. निवडणुकांमध्ये वाढलेला खर्च हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. ‘दळभद्री कार्यकर्त्यांसाठी’ डान्स बार म्हणजे एक खुराक आणि राजकीय पक्षांसाठी खर्चाचा मुख्य भाग बनला होता. फक्त राजकीय पक्षासाठीच काय म्हणून.. कॉर्पोरेट क्षेत्रासाठीसुद्धा डान्स बार ही खर्च वाढवणारी डोकेदुखी होती. कुठलंही ‘डील’ हे डान्स बारशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं.. अर्थात डान्स बार थांबले म्हणून सर्व काही थांबले असे नव्हते. डान्स बार असल्याचा आपल्या समाजावर विपरीत परिणाम होईल, असे वाटणे साहजिक आहे, पण डान्स बार नसल्याचा देखील आपल्या समाजावर वाईट परिणाम होतो हे वाढलेल्या बलात्कारांच्या संख्येवरून ध्यानात येईल. डान्स बार जेव्हा चालू होते तेव्हा ‘एड्स’ या रोगाने मरणारे मी अनेक बघितले. डान्सबार बंद झाल्यावर अशी घटना मला दिसली नाही.
 मला वाटतं की सरकारने ते ‘कडक कायदे’ वैगेरे काय ते नक्कीच करावेत, पण त्याआधी लंगिक शिक्षणाचा समावेश माध्यमिक शिक्षणात करावा. तसेच अशा डान्सबारच्या बारबालांचे डेली मेडिकल चेकअप करणे बारमालकांसाठी कायदेशीररीत्या बंधनकारक करावे, तसेच त्याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा. डान्स बार आणि प्रॉस्टिटय़ूशन यावर पूर्ण बंदी घालणे सरकारलाही शक्य नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावरून जाहीर झालेच आहे, पण त्याचे ‘नियमन, नियंत्रण आणि नियोजन’ हे सरकार व्यवस्थित करू शकेल, अशी मला खात्री आहे.
चेतन जोशी, पनवेल

नारळीकरांना  ‘भारतरत्न’ने गौरवावे!
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ जयंतराव नारळीकर हे १९ जुलै रोजी वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. या अलौकिक व्यक्तिमत्त्वाला उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारित घराण्याची पाश्र्वभूमी लाभलेली आहे. असामान्य आणि तीव्र बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या जयंतरावांना केंब्रिजसारख्या मानाच्या विद्यापीठात सहज प्रवेश मिळाला आणि लहान वयातच त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक मानसन्मान प्राप्त केले. प्रचंड विद्वत्ता असलेले नारळीकर विनम्र वृत्तीचे आहेत. परदेशांमध्ये नोकरी- व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त झालेल्या असताना निग्रहाने त्याला नकार देऊन ते भारतात कुटुंबीयासह परत आले आणि मायभूमीत स्थायिक झाले. खगोलशास्त्र आणि विज्ञान या विषयांत नारळीकरांनी विपुल लिखाण केले आहे. कथा, कादंबरी, लेख या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे त्यांचे आत्मचरित्ररूपी पुस्तक यादृष्टीने अत्यंत वाचनीय आहे. जयंतराव नारळीकरांसारख्या व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.
अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण.

आठवले स्पष्टच बोलले..
‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मधील रामदास आठवलेंचे मुक्तचिंतन (१४ जुलै) वाचले. रामदास आठवले म्हणजे एक रांगडं व्यक्तिमत्त्व. जे पोटात तेच ओठात. अशा व्यक्ती राजकारणात फार दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणूनच ते युतीला खडसावतात की आम्ही तुमच्यामागे फरफटत येणार नाही.जागा कमी पडल्या तर मनसेचीही मदत घेऊ असे ते दिलखुलासपणे जाहीर करतात. इतक्या उघडपणे राजकारणात कुणी बोलत नाही. पण रामदास आठवले हे एक अजब रसायन आहे. भाजप, शिवसेनेला सतत जातीयवादी ठरवून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीनेच जातीयवाद जिवंत ठेवला, दलितांवर सर्वाधिक अत्याचार यांनीच केले हे एका हाडाच्या आंबेडकरी चळवळ्याच्या अंत:करणातून निघालेले सत्य सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारे आहे.
– सोमनाथ देशमाने,अहमदनगर.