श्रीगोंदवलेकर महाराजांनी जो ‘नामयोग’अर्थात शाश्वत आनंदप्राप्तीचा मार्ग एका वाक्यात सांगितला त्यात मोठी यौगिक क्रिया दडली आहे. योगानं जे साधतं तेच नामानंही साधतं, असंही श्रीमहाराज सांगतात. तेव्हा सर्वप्रथम अगदी त्रोटक स्वरूपात ‘योग’ समजावून घेऊ. योगविषयक या चिंतनाला प्रामुख्याने आधार आहे तो राजयोग (स्वामी विवेकानंद/ प्रकाशक – रामकृष्ण मठ) आणि ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातञ्जल योगदर्शन’ (कृष्णाजी केशव कोल्हटकर / प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे) या ग्रंथांचा. आता मुळात ‘योगा’चं प्रयोजन काय? स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘भारतातील सर्वच आस्तिक तत्त्वज्ञानांचे अथवा वेदांना प्रमाण मानणाऱ्या तत्त्वज्ञानांचे एकमेव ध्येय आहे – पूर्णत्व प्राप्त करून घेऊन आत्म्याची मुक्ती साधणे. त्याचा उपाय आहे- योग’’ (राजयोगाची भूमिका, पृ. ३). तत्त्वज्ञान सांगतं की, आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. तो मायेच्या आवरणात आबद्ध होऊन जीवरूपानं जन्म-मृत्यूच्या चक्रात आला आहे. परमात्मा पूर्ण आहे तसाच त्याचा अंश असलेला आत्माही पूर्णच आहे. परमात्मा शुद्ध, मुक्त आहे तसाच आत्माही शुद्ध, मुक्त आहे. पण देहबुद्धीच्या पकडीने बद्ध होऊन तो अपूर्णत्वानं वावरत आहे. आत्म्याला परमात्म्यात विलीन करणं, देहबुद्धीची आत्मबुद्धी करणं, अपूर्णत्वाला पूर्णत्वात विलीन करणं यासाठीचा उपाय, यासाठीची साधना म्हणजेच योग. माणूस अपूर्णात का अडकून आहे? मायेत का बद्ध आहे? कारण त्याचं चित्त मलिन झालं आहे. चित्तशुद्धीशिवाय त्याच मन, बुद्धीयुक्त अंत:करण शुद्ध होणार नाही. एकाग्र अर्थात पूर्णत्वाच्या ध्येयासाठी तत्पर होणार नाही. म्हणूनच पतंजली मुनींनी योग म्हणजे चित्तशुद्धी, हाच अर्थ सांगितला आहे. ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:।।’ चित्ताला निरनिराळ्या वृत्तींमागे वाहू न देणे, हा योग आहे! आता मन, चित्त, बुद्धी, अहंकार या चार गोष्टींनी मिळून अंत:करण बनतं. प्रत्यक्षात सारं काही एकच आहे. चित्तातली ‘मी आहे’ ही जाणीव हा अहं, चित्त जेव्हा चिंतन करतं तेव्हा ते चित्त बनतं, मनन करतं तेव्हा मन बनतं, बोध करतं तेव्हा बुद्धी बनतं. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘हे चित्त आपल्या शुद्ध स्वरूपाप्रत जाण्याचा प्रयत्न करीत असतं पण इंद्रियं त्याला बाहेर खेचत असतात. चित्ताचा संयम करणं, त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीला आळा घालणं आणि त्याला चिद्घन पुरुषाकडे (पूर्णत्वाकडे) परत फिरावयास लावणं हीच योगाची पहिली पायरी आहे.’’ स्वामीजी असंही सांगतात की, ‘‘सर्व प्राणिमात्रांत चित्त असलं तरी फक्त माणसातच ते बुद्धीच्या रूपात विकसित आहे. जोपर्यंत चित्त बुद्धीचं रूप धारण करीत नाही तोवर या सर्व (अज्ञानाच्या) अवस्थांतून पार पडून त्याला आत्म्याचा बंध नाहीसा करता येत नाही.’’ तेव्हा चित्तशुद्धीशिवाय मन आणि बुद्धीची शुद्धी होणार नाही. अहंकारयुक्त ‘मी’च्या जागी स्वरूपाची जाणीव होणार नाही. तेव्हा चित्तशुद्धीने स्वरूपप्राप्ती हाच योग आहे. चित्तशुद्धीनेच मन आणि बुद्धी शुद्ध आणि सूक्ष्म बनून मानवी जन्माचं जे सर्वोच्च ध्येय पूर्णता ते प्राप्त करू शकेल.