‘‘पांढऱ्या सोन्या’, तुलाही झळाळी येईलच की. का एवढं मनाला लावून घेतोस? ’’ ऊस आपल्याला दिलासा देतोय, की जखमेवर मीठ चोळतोय, हा प्रश्न कापसाला पडला. ‘‘ आपण सगळ्या जगाची लाज झाकायची आणि आपल्यावरच असे उघडेनागडे कुठेही पडून राहण्याची वेळ का यावी?’’ एवढे बोलून कापूस स्तब्ध झाला..  हा प्रश्न आपल्यासाठी नाही, अशी ठाम मनोधारणा करीत उसाने दीर्घ नि:श्वास टाकला..
रात्रीचा अंधार घट्ट होता दाट सायीसारखा. वातावरणात कमालीची नीरवता. या शांततेवर ओरखडा उमटेल असे काहीच घडत नव्हते. आपलाच श्वास आपल्याला ठळक जाणवेल एवढी स्तब्धता. झाडाचे पानही वाऱ्याने हलत नव्हते. कडाक्याच्या थंडीत पिकांचे अंगही जखडलेले. बांधाच्या अलीकडे कापूस आणि पलीकडे ऊस. दोघांमध्येही फक्त बांधच आडवा. सुरुवातीला उसाच्या पानांमधून खडखड असा आवाज आला. दवामुळे ओलसर झालेल्या कापसाच्या पानांना शहारल्यासारखे झाले. जरा सावध झाला कापूस. पुन्हा उसाच्याच बाजूंनी घसा खाकरल्यासारखा पाचटीचा आवाज. कापसाने आवाजाकडे कान लावला. सगळी निरवानिरव झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात अधूनमधून दोघांचे बोलणे व्हायचे; पण आताची वेळ निर्वाणीची. दोघेही एकमेकांचा निरोप घेणार काही दिवसांत. त्यामुळे दोघांनाही जरा अवघडल्यासारखे झाले.
‘‘अशात पाणी तोडले आहे माझे. नसता पाण्यात उभं राहून बोलायला अशा कडाक्याच्या थंडीत जीभच वळली नसती. आता कधीही तोडणीसाठी टोळ्या येतील अन् मग आपली भेट होणार नाही. म्हणून म्हटलं जरा बोलावं, आता कधीही निघायचंच.’’ उसाचा स्वर जरा कातर झालेला; पण त्यात कमावलेपणा अधिक.
‘‘तुझं काय बाबा, तू शेतातून बाहेर पडण्याआधी लोक तुझ्यावर बोलायला तयार. तुला चांगला भाव मिळावा म्हणून रस्ते अडवायचे, बसगाडय़ांवर दगडफेक करायची, सरकारला धारेवर धरायचे, तुझ्यासाठी कायपण करायला लोक तयार. एकदा कारखान्याचे बॉयलर पेटले, की मग दुसरे कोणतेच पीक महाराष्ट्रात नाही असा सगळा माहोल तयार करतात पेपरवाले, टीव्हीवाले.. तुझ्याएवढं ‘ग्लॅमर’ सध्या दुसऱ्या कोणत्याच पिकाला नाही. आम्हाला विचारतं कोण? तुझ्यासाठी सरकार हादरतं. जेवढी जमीन तुझ्या लागवडीखाली त्याच्या चौपट जमीन माझ्या लागवडीखाली आहे; पण आमच्यासाठी कोण बोंबलणार?’’ अनेक वर्षांपूर्वीची अस्वस्थता कापसाच्या तोंडून बाहेर पडू लागली. कधी काळी विरोधक आपल्याबद्दल बोलायला लागले की, ‘यांचा कापसाचा संबंध वाती वळण्यापुरता आणि हे फक्त तुळशीच्या लग्नालाच ऊस घरी आणतात’ असे जन्म‘जात’ शेतकरी नेत्यांकडून बोलले जायचे. त्या वेळी कापसाला वाटायचे ऊस आपला सहचर आहे; पण नंतर प्रत्येक पावलावर त्याला विषमता जाणवायला लागली. सरकार कोणतेही असो, ते आपल्यापेक्षा उसाचीच जास्त काळजी करते, हा अनुभव कापसाने वारंवार घेतलेला होता.
ऊसतोडणीआधी फडातले पाणी बंद करतात म्हणून उसाला वाटले आता निरोपाच्या वेळी काही बोलावे, तर कापसाच्या बोलण्यातला नाराजीचा धागा त्याला ठळक जाणवला. ‘‘आज तुझं पाणी बंद केलंय; पण महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त पाणी तूच फस्त करतोस. किती तुझी अघोरी तहान. पाणीटंचाईत लोकांचे हाल होतील; पण तू मात्र कायम पोट टम्म भरल्यानंतर ढेकर दिल्यासारखा असतोस कधीही. तुला ‘पाणीदार’ म्हणतात ते उगीच नाही. बागायतदारांना तुझा लळा, तुझ्या शुभ्र दाणेदार साखरेचे आणि कडक इस्त्रीतल्या पांढऱ्याशुभ्र कपडय़ाचे नाते किती जवळचे. कितीही झालं तरी तू ‘राजकीय पीक’ बाबा. तुझी अन् आमची बरोबरी कशी होणार?’’ आमची म्हणताना कापसाच्या डोळ्यासमोर उडीद, सोयाबीन, धान असे आपलेच काही सख्खे भाऊ होते. कापडाच्या किमती वाढत आहेत आणि आपल्याला मात्र किंमत नाही. शेतकऱ्यांनी क्विंटलभर कापूस विकला तरीही दिवाळीच्या सणाला साऱ्या घरादाराचे कपडे तो घेऊ शकत नाही याचा अनुभव कापसाने नेमकाच घेतलेला होता.
उसाला वाटले, हा बाबा आता गाऱ्हाणी करत राहणार, रडत राहणार. सत्तेवर आपला प्रभाव असतोच हे नाकारण्यात अर्थ नाही. साखर कारखान्यातल्या पुढाऱ्यांना आपला लळा आहे याचे कारण त्यांच्या गळ्यात रुळणाऱ्या सोनसाखळ्यांची झळाळी ही आपल्यामुळेच आहे हेही नाकबूल करण्यात अर्थ नाही. आपल्याबद्दलचा पुळका हा फक्त पुढाऱ्यांनाच आहे असे नाही, तर शेतकरी नेत्यांनाही आहे. याची ‘नम्र’ जाणीवही उसाला होतीच. शेतकरी नेते कापसाबद्दलही बोलतात अधूनमधून; पण भांडतात मात्र आपल्यासाठी हेही उसाला मान्यच होते. आता साखरपट्टय़ात दबदबा ठेवायचा असेल, तर कापूस, सोयाबीनबद्दल बोलून कसे चालेल? साखर कारखानदारीत पुढाऱ्यांचा प्राण गुंतलेला आणि कारखानदारीचे सगळेच भवितव्य आपल्यावर याचीही उसाला पुरेपूर कल्पना होती.. तसा शेतातून बाहेर पडण्याचा ऊस आणि कापूस या दोघांचाही काळ जवळपास एकाच वेळी सुरू होतो; पण उसाचा डामडौल वेगळा, त्याचा थाटमाट वेगळा. कापूस आपला कुठेही बेवारस अवस्थेत पडलेला. याची सल कापसाच्या मनातून काही जाता जात नव्हती. उसाचे पुढाऱ्याशी जवळचे नाते, त्यामुळे एखाद्याचा ज्वलंत प्रश्न ऐकून घेतानाही हादरून न जाता जो बनचुका समजूतदारपणा दाखवावा लागतो त्याचा पुरेपूर वापर करीत उसाने कापसाला धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘जातीलही हे दिवस’ अशी भावना त्याच्या आवाजात होती.
‘‘माझ्या ‘पांढऱ्या सोन्या’, तुलाही झळाळी येईलच की. का एवढं मनाला लावून घेतोस? उकिरडय़ाचाही पांग फिटत असतो कधीकधी.’’ ऊस आपल्याला दिलासा देतोय, की जखमेवर मीठ चोळतोय, हा प्रश्न कापसाला पडला. मुख्य म्हणजे आपल्यासाठी नेहमीच लावल्या जाणाऱ्या ‘पांढरे सोने’ या विशेषणाची त्याला भयंकर चीड आली. ऊस तुऱ्याला आला आहे, हे त्याला अंधारातही दिसतच होते; पण तो तोऱ्यात येऊन बोलतोय याचे दु:ख जास्त होते.
‘‘ऊस डोंगा आणि त्याची सहानुभूतीही डोंगी,’’ असे कापूस स्वत:शीच पुटपुटला; पण उसाला ते ‘ढोंगी’ असे ऐकू आले. आपला कळवळा काही कापसापर्यंत पोहोचत नाही, अशी त्याने मनाची तयारी करून घेतली आणि ज्याचे भोग त्यानेच भोगावेत, आपण तरी कोणाचे प्राक्तन बदलणार, अशी आध्यात्मिक भावना त्याच्या ठायी निर्माण झाली. ‘‘बरंय, तर भेटू’’ असे निरोपादाखल ऊस बोलला. उसाला तरी पाचटीचे कवच होते; पण कापूस कुडकुडत उभा होता. उसाच्या बोलण्याला प्रतिसाद देण्यासाठी तो म्हणाला, ‘‘हो नक्की. साला, आपण सगळ्या जगाची लाज झाकायची आणि आपल्यावरच असे बेवारस, उघडेनागडे कुठेही पडून राहण्याची वेळ का यावी?’’ एवढे बोलून कापूस स्तब्धच झाला. त्याने स्वत:शीच प्रश्न उपस्थित केला होता; पण तो प्रकट उच्चारला गेला. हा प्रश्न आपल्यासाठी नाही, अशी ठाम मनोधारणा करीत उसाने दीर्घ नि:श्वास टाकला.. वातावरणातली सारी पोकळी धीरगंभीर अशा मौनाने भारावून गेली होती. अंधार गडद होत होता आणि थंडीही वाढतच चालली होती.