06 July 2020

News Flash

जंटलमन ते माफिया..

‘जंटलमन्स गेम’ म्हणवला जाणारा क्रिकेटचा खेळ ब्रिटिश अमलाखालील भारतात रुजला, तो संस्थानिक आणि धनिकांमध्ये. स्वातंत्र्यानंतर या खेळाचे चांगलेच लोकशाहीकरण झाले आणि लोकप्रियता वाढत गेल्यानंतर, गेल्या

| June 7, 2013 12:25 pm

‘जंटलमन्स गेम’ म्हणवला जाणारा क्रिकेटचा खेळ ब्रिटिश अमलाखालील भारतात रुजला, तो संस्थानिक आणि धनिकांमध्ये. स्वातंत्र्यानंतर या खेळाचे चांगलेच लोकशाहीकरण झाले आणि लोकप्रियता वाढत गेल्यानंतर, गेल्या काही वर्षांत तर व्यावसायिकीकरण किंवा धंदेवाईकीकरणच झाले. फिक्सिंगमुळे माफियांचा खेळ बनलेल्या आत्ताच्या क्रिकेटला हे रूप अचानक आलेले नाही..
जगाच्या पाठीवर ब्रिटिशांनी ज्या देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या त्या ठिकाणी ब्रिटिश शिक्षण, संस्कृती, रीतिरिवाज आणि खेळांचाही प्रसार केला. गेल्या शतकात हे सर्व देश ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले, पण ‘साहेबा’ने दिलेले रीतिरिवाज आणि खेळ तसेच चालू राहिले. यापैकीच एक अतिशय लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. साहेबाच्या शिस्तीत आणि संस्कृतीनुसार अतिशय सभ्य असा मानला जाणारा हा क्रीडा प्रकार भारतातही सहजपणे रुजला. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचं स्वरूप स्वाभाविकपणे समाजाच्या उच्चवर्गीयांपुरतं, राजे-संस्थानिकांपुरतं मर्यादित होतं. पण स्वातंत्र्यानंतर हे चित्र झपाटय़ानं बदललं. भारतीय माणसाला हिंदी चित्रपटानं पूर्वीच वेड लावलं होतं. आता क्रिकेट हे त्याचं दुसरं वेड झालं. चित्रपटसृष्टीतल्या झगमगत्या तारे-तारकांच्या गाडय़ांमागे धावणारा, त्यांच्या बंगल्यांबाहेर दर्शनासाठी ताटकळत वेडय़ासारखं प्रेम करणारा, त्यांची देवालयं उभारणारा भारतीय माणूस क्रिकेटपटूंवरही तसंच प्रेम उधळू लागला. पण यंदाच्या आयपीएल स्पध्रेच्या काळात उघडकीला आलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाने हे क्रिकेटमधले देवही चित्रपटांमधल्या नायक-नायिकांएवढेच बेगडी असतात, हा विदारक अनुभव त्याला आला आहे.
संस्थानिकांच्या घराण्यातून आलेल्या मन्सूरअली खान पतौडी या नबाबाने भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व स्वीकारलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघाला खऱ्या अर्थानं मान्यता मिळू लागली. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या ‘टायगर’ पतौडीने प्रथमच भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावली. तरीसुद्धा स्पध्रेतला विजय ही बाब या संघासाठी अपूर्वाईच असायची. त्या काळात भारतात टीव्हीचा प्रसार झालेला नव्हता. रेडिओवरून केलं जाणारं धावतं वर्णन क्रिकेट शौकिन कानात प्राण आणून ऐकत. त्या वेळी रेडिओसुद्धा घरोघरी पोचले नव्हते. त्यामुळे शहरांमध्ये रेडिओ विक्रीच्या दुकानाबाहेर हे वर्णन ऐकण्यासाठी गर्दी जमत असे. (पुढे अशीच गर्दी टीव्हीच्या सुरवातीच्या जमान्यात शहरांमधल्या टीव्ही शोरूमसमोर दिसत असे.) पण त्यामध्ये आनंद साजरा करण्यासारखे क्षण क्वचितच असत. राजू भारतन, आनंद सेटलवाड, विजय र्मचट, बॉबी तल्यारखान, लाला अमरनाथ हा त्या काळात रेडिओवरील समालोचकांचा अतिशय लोकप्रिय चमू होता. विशेषत: तल्यारखान आणि लाला अमरनाथ यांच्या खास तिरकस टिप्पणी ऐकण्याजोग्या असत.  एखाद्या खेळाडूने निवृत्त कधी व्हावं, या मुद्दय़ावर भाष्य करताना एकदा विजय र्मचट समालोचनाच्या ओघात म्हणाले होते, ‘माझा खेळ फारसा उतरणीला लागला नसतानाही मी निवृत्तीचा निर्णय घेतला कारण, एक वाक्य माझ्या मनावर पूर्वीच कोरलं गेलं होतं ‘you should retire before somebody says, why don’t you ?’  सचिनने हे वाक्य बहुधा अजून कुठे ऐकलं नसावं.
अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९७०-७१ मध्ये विंडीज व इंग्लंडची मालिका जिंकली आणि तमाम भारतीयांचं मन अभिमानाने उचंबळून आलं. या मालिकांपासून सुनील गावस्कर नावाचं वादळ भारतीय क्रिकेट जगत अनुभवू लागलं. सलामीला येऊन वेस्ट इंडिजच्या अ‍ॅण्डी रॉबर्टस् किंवा मायकेल होल्डिंगसारख्या तुफानी गोलंदाजांचा गावस्कर ज्या तऱ्हेने समाचार घेत असत ते पाहून शब्दश: डोळय़ांचं पारणं फिटे. विशेषत: गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याचा फॉलो थ्रू पूर्ण व्हायच्या आत त्याच्याजवळून पाठीमागे सीमारेषा पार करत असे तेव्हा हताशपणे पाहण्यापलीकडे गोलंदाजाच्या हाती काही उरत नसे. तरीसुद्धा एखादा पतौडी, एखादा वाडेकर-सरदेसाई, एखादा सुनील गावस्कर, मुख्यत्वे भारतीय खेळपट्टय़ांवर चालणारी चंद्रा-बेदी-प्रसन्ना या त्रिकुटाची फिरकी असं माफकच समाधान भारतीय संघ आणि प्रेक्षकांच्या पदरी त्या काळात पडत असे. पण १९८३ मध्ये जागतिक दर्जाचा अष्टपैलू कर्णधार कपिलदेवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हापासून क्रिकेटच्या क्षेत्रात भारतीय संघाचा वेगळा दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेटचं ते सांघिक दर्शन अतिशय प्रभावी होतं. जागतिक क्रमवारीत या संघाची दखल घेतली जाऊ लागली. भारतीय क्रिकेटला वेगळं वलय प्राप्त झालं.
या ठिकाणी नमूद करण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुनील गावस्करांनीच भारतीय  क्रिकेटपटूचा असा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण केला आणि त्याची पुरेपूर किंमत वसूल केली. अगदी गायन किंवा चित्रपटाच्या क्षेत्रातही त्याचा प्रयोग करून पाहिला. बदलत्या काळानुसार भूमिका बदलत, पण आजही क्रिकेट जगताचं मध्यस्थान न सोडणारे सुनील गावस्कर हे पहिले सर्वार्थाने व्यावसायिक भारतीय क्रिकेटपटू म्हणावे लागतील.
कपिलदेवनंतरचा सर्वात यशस्वी कर्णधार महंमद अझरुद्दीन या शैलीदार फलंदाजाने दुर्दैवाने ‘मॅच फिक्सिंग’ या शब्दाचा पहिला परिचय भारतीय क्रिकेट क्षेत्राला करून दिला. त्या पाठोपाठ मनोज प्रभाकर, अजय जडेजा या खेळाडूंवरही जाणूनबुजून सामना हरल्याचे आरोप होऊ लागले. याचं अतिशय विकृत स्वरूप- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग- आज जगभरातले क्रिकेटप्रेमी अनुभवत आहेत.
क्रिकेटच्या उदयापासून या खेळाच्या स्वरूपात आणि नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. १९७१पर्यंत पाच किंवा त्याआधी सुट्टीचा दिवस धरून सहा दिवसांचा कसोटी सामना असे. इतके दिवस खेळताना खेळाडू आणि हा प्रेक्षकही कंटाळू लागले. अनिर्णित राहणाऱ्या सामन्यांमुळे या कंटाळवाणेपणात आणखी भर पडली. त्यावर पर्यायांचा विचार सुरू झाला. त्यातूनच १९७१ मध्ये प्रथम इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये पहिला मर्यादित षटकांचा सामना खेळला गेला. त्यानंतर १९७५ पासून अधिकृतपणे मर्यादित षटकांची विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. दिवस-रात्र किंवा केवळ रात्रीही मर्यादित षटकांचे सामने रंगू लागले आणि क्रिकेटपटूंच्या कपडय़ांचे रंगही बदलले. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात साठ किंवा पन्नास षटकंही जास्त वाटू लागली. मग ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी’चा हंगामा सुरू झाला. देशोदेशीचे आघाडीचे खेळाडू त्यामध्ये सहभागी होऊ लागले. प्रत्यक्ष सामन्यापेक्षाही त्याच्या आधीचे किंवा नंतरचे रंगारंग कार्यक्रम आणि चीअर गर्ल्स जास्त चर्चेचा विषय होऊ लागले. थोडा स्मरणशक्तीला ताण दिला तर या प्रकारचा पहिला प्रयोग १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियात केरी पॅकर नावाच्या गृहस्थांनी केला होता. त्याला त्या वेळी कुचेष्टेने ‘पॅकर्स सर्कस’ असं संबोधलं जात होतं. व्यक्तिगत पातळीवरचा हा प्रयोग मात्र फार काळ यशस्वी झाला नाही.  
सुनील गावस्कर, बिल लॉरी, रॉडनी मार्श, जेफ बॉयकॉट, इयान बोथम, रिचडर्स हॅडली, शैलीदार झहीर अब्बास आणि सध्या राजकीय इनिंग्जमध्ये जम बसवत असलेला इमरान खान, जॉण्टी ऱ्होड्स किंवा गॅरी सोबर्स-व्हिव रिचडर्स, मैदानावर लोढण्यासारखी बॅट ओढत येणारा क्लाईव्ह लॉईड यांच्या जमान्यापासून क्रिकेटचा आनंद लुटणाऱ्या जगभरातल्या क्रिकेट शौकीन पिढय़ांनी हे सारे बदल कळत-नकळत पचवले. पण त्याचबरोबर क्रिकेटमधील व्यावसायिकतेचं धंदेवाईकपणामध्ये रूपांतर होऊ लागलं. फॉर्ममध्ये असलेला क्रिकेटपटू मैदानापेक्षा जाहिरातपटांमध्ये, रात्रीच्या पाटर्य़ामध्ये जास्त चमकू लागला. निरनिराळय़ा कंपन्यांचे लोगो त्याच्या कपडय़ांवर मोक्याच्या जागा पटकावू लागले. १९७०च्या जमान्यात आख्खा कसोटी सामना खेळणाऱ्या चंदू बोर्डेसारख्या ख्यातनाम फलंदाजाला जेमतेम अडीचशे रुपये मानधन मिळायचं, ही दंतकथा किंवा पुराणकथा म्हणूनसुद्धा विश्वास ठेवण्याजोगी वाटू नये, अशा पटीत रणजी खेळाडूंच्या मानधनाचे आकडे वाढले आणि यातून तितक्याच अविश्वासार्ह वाटणाऱ्या अपप्रवृत्ती चोरपावलाने या खेळात शिरल्या. तरीसुद्धा त्याची चर्चा क्रिकेट मंडळाच्या पातळीवरील कारवाईपलीकडे होत नव्हती. यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र थेट पोलीस यंत्रणेने भांडेफोड केली.
या कमालीच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत हंगामी अध्यक्ष बनलेले जगमोहन दालमिया क्रिकेटमध्ये आणलेल्या टोकाच्या व्यावसायिकीकरणामुळे काही वर्षांपूर्वीच ‘डॉलरमियाँ’ म्हणून हिणवले गेले होते आणि कारकिर्दीतील गैरप्रकारांबद्दल त्यांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली होती, हे अनेकांच्या विस्मृतीत गेलं असेल. त्यांच्यावर ती वेळ आणणाऱ्या सर्वक्रीडासंपन्न शरद पवार यांच्यावर या वेळी मात्र त्या काळातील त्यांचे साथीदार श्रीनिवासन यांनी हा डाव उलटवला, हा आणखी एक विचित्र योगायोग! पण या गटा-तटाच्या राजकीय साटमारीपेक्षाही क्रिकेटच्या खेळामध्ये बेटिंगमुळे झालेला माफिया टोळय़ांचा शिरकाव ही जास्त चिंताजनक बाब आहे. एके काळी ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ आता जगभरातल्या माफियांचा खेळ बनू पाहत आहे. घोडय़ांच्या शर्यतींप्रमाणे या खेळाकडे पाहणारी, खेळातल्या नैतिकतेचं सोयर-सुतक नसलेली मालक मंडळी, स्पर्धा संयोजक आणि भवताली घडणाऱ्या घटनांबद्दल डोळय़ांवर व तोंडावर पट्टी बांधून बसलेले सर्व मातब्बर खेळाडू या परिस्थितीला जास्त जबाबदार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2013 12:25 pm

Web Title: cricket gentleman to mafia
Next Stories
1 रात्र संपली, पण..
2 लाल भाईंचा साम्राज्यवाद
3 ‘ललित’ची भावंडं..
Just Now!
X