दिल्ली आणि लाहोरमधील अंतराच्या गुढाचा शोध घेण्यासाठी माजी न्यायमूर्तीची एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही बातमी असत्य, तथ्यहीन, खोडसाळ, बदनामीकारक, थोडक्यात राजकारणी नेते आपल्याविरोधातील बातम्यांचा ज्या शब्दांत इन्कार करतात तशा स्वरूपाची कोणास वाटेल. परंतु तसे मुळीच नाही. एप्रिलमधील अहमकदिनास अजून चांगले आठ दिवस आहेत. तेव्हा त्यातलाही हा प्रकार नाही. बातमी खरीच आहे. हेही खरे, की ती कोणाही सुज्ञ शहाण्यास बुचकळ्यात टाकणारी आहे. आकाशगंगेतील ग्रह आणि ताऱ्यांतील अंतर आज आपण नेमके सांगू शकतो. तोंडपाठ नाही सांगता आले, तर पटकन गुगल करून सांगू शकतो. आपण तेवढी प्रगती नक्कीच केली आहे. आता एमएच ३७०चे नेमके काय झाले हे अजून सांगता येत नाही, हा भाग वेगळा. पण त्याचाही पत्ता लागेल. तेव्हा दिल्ली ते लाहोर हे अंतर नेमके सांगण्यात काहीच अडचण नाही. परंतु भारत नामक महाराष्ट्रामध्ये काहीही होऊ शकते, असा एक जागतिक सिद्धांत आहे. त्यानुसार हे घडलेले आहे. दिल्ली आणि लाहोर या दोन महत्त्वाच्या शहरांतील अंतराचा गुंता निर्माण झाला आहे. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) म्हणण्यानुसार हे अंतर ४९१ किमी आहे. पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या मते ते ५१४ किमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते ते ५२३ किमी आहे, तर एका खासगी बस वाहतूक कंपनीचा दावा आहे, की ते ५४० किमी आहे. हे दावे बाजूस ठेवून आपण गुगलवर विसंबावे, तर तेथे डिस्टन्स फ्रॉम डॉट कॉम नामक संकेतस्थळ आपणास ४८९ किमी असा वेगळाच आकडा देते. वस्तुत: कोणत्याही दोन स्थिर िबदूंमधील अंतर स्थिर असते, असे आपले शालेय भौतिकशास्त्रसुद्धा सांगत असताना, हे काही भलतेच कसे घडत आहे, मुळात हा प्रश्नच का उद्भवला, असा सवाल आपल्या मनात आला असेल. याला कारण झाले डीटीसी आणि एका खासगी बस कंपनीतील भांडण. दिल्ली-लाहोर बससेवा चालविण्याचे कंत्राट डीटीसीने या कंपनीला दिले आहे. डीटीसी या कंपनीला अंतरानुसार पसे देते. पण बहुधा या दोघांचाही दृष्टिकोन वेगळा असल्याने, अंतरात फरक पडला आणि कंपनीला कमी पसे देण्यात आले. तेव्हा प्रकरण न्यायालयात गेले. तेथे विविध संस्थांची साक्ष काढण्यात आली, तर त्यातही फरक पडला. तेव्हा अखेर न्यायालयाने सांगितले, की पंच नेमा आणि वाद सोडवा. त्यानुसार डीटीसीने निवृत्त न्यायमूर्ती रेखा शर्मा यांची नियुक्ती केली. आता न्यायमूर्ती महोदया स्वत: हा प्रवास करून अंतर मोजणार आहेत किंवा त्यासाठी कोणास नेमणार आहेत. तेव्हा आगामी काळात दिल्ली आणि लाहोर यांच्यातील नेमक्या अंतराचे गूढ उलगडेल अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही. तथापि याबाबतही शंका आहेत. असणारच. खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाला जेथे दिल्ली-लाहोर असा बस प्रवास करूनही त्या अंतराचा नेमका पत्ता लागला नाही, तेथे या पंचांचा काय पाड लागणार, असे कोणासही वाटू शकते. त्यातही तथ्य आहे. याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर हा मुळात भौतिकशास्त्राचा प्रश्नच नाही. तो आधी, मध्ये आणि नंतरही मानसशास्त्राचाच मुद्दा आहे. त्यामुळे १९४७  पासूनचा अनुभव असा आहे, की हे अंतर कधी कमी, कधी जास्त असे नेहमीच झुलते राहिले आहे. ते कमी होणे हे दोघांच्याही तसे फायद्याचे. पण त्यासाठी मनामनांतील अंतराय कमी व्हायला हवा. प्रश्न हाच, की त्याआड येणाऱ्या राजकीय हितसंबंधांचे काय करायचे?

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल