राष्ट्र जितके मागास आणि दरिद्री तेवढी तेथील अराजक, बंडाळी आणि यादवीची शक्यता अधिक हे समीकरण आता दक्षिण सुदानने सिद्ध केले आहे. एरवी अशा छोटय़ा देशांतली यादवी युद्धे नेहमीचीच म्हणून दुर्लक्षली जातात. या युद्धामध्ये दोन भारतीय शांतिसनिक शहीद झाल्यामुळे ते चच्रेत आले आहे. तसा हा अगदी नवा कोरा देश. अवघ्या अडीच वर्षांपूर्वी सुदानपासून स्वतंत्र झालेला. त्याला स्वातंत्र्य मिळाले तेही सशस्त्र यादवी संघर्षांतून. यानंतर तेथे शांतता नांदेल. आपल्या तेलविहिरींच्या जोरावर तो समृद्ध होईल, अशी आशा होती. पण स्वातंत्र्यानंतर लगेचच सुदानशी सुरू झालेला सीमावाद, त्यातूनच पुढे बंद ठेवण्यात आलेले तेलाचे उत्पादन यामुळे हा देश कुपोषितच राहिला आणि आता तेथे वांशिक संघर्ष सुरू झाला आहे. िडका आणि लू नूएर हे तेथील दोन प्रमुख वंश. यापूर्वी दोघे मिळून सुदानशी लढले होते. आज ते एकमेकांशी लढत आहेत. त्याचे कारण साधेच होते. दक्षिण सुदानचे राष्ट्रपती साल्व्हा कीर हे िडका वंशाचे. स्वातंत्र्यवीर. त्यामुळे राष्ट्रपतींच्या रक्षक दलात बहुवांशिक सनिकांचा समावेश आहे. नऊ दिवसांपूर्वी त्यातल्या िडका आणि नूएर सनिकांचे भांडण झाले. त्यातून गोळीबार झाला. राष्ट्रपती भवनावर काही सनिकांनी तोफा डागल्या. काही दिवसांपूर्वीच कीर यांचे त्यांचे उपराष्ट्रपती रिएक माशर यांच्याशी वाजले होते. कीर यांनी त्यांची हकालपट्टी केली होती. माशर हे लू नूएर वंशाचे. कीर यांना वाटले, त्यांच्या निष्ठावंतांनीच राष्ट्रपती भवनावर हल्ला केला आणि आपली सत्ता उलथवून लावण्याचा हा कट आहे. या संशयातून मग राजधानी ज्युबामध्ये नूएरांचे कत्लेआम सुरू झाले. ते ठिकठिकाणी पसरले. मग न्यूएर सनिकांनी लष्कर सोडले आणि ते आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी उतरले. अशा जातीय वा वांशिक दंगलींमध्ये आपल्या लोकांच्या संरक्षणाचा अर्थ नेहमीच दुसऱ्या लोकांची कत्तल असा असतो. त्यानुसार न्यूएर बंडखोर आणि दंगलखोरांनी िडकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दक्षिण सुदानमधील बोर हे महत्त्वाचे शहर त्यांनी ताब्यात घेतले. तेथे संयुक्त राष्ट्रांचा तळ आहे. ४३ भारतीय शांतिसनिक त्याचे संरक्षण करतात. बोरमधील ३६ िडका शरणार्थीनी गेल्या गुरुवारी त्यांचा आसरा घेतला. त्यांना ठार मारण्यासाठी सुमारे दोन हजारांच्या जमावाने तळावर सशस्त्र हल्ला केला. त्यात दोन भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेनंतर आपल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी गेलेल्या अमेरिकी विमानावर बंडखोरांनी हल्ला केला. आता हा संघर्ष हाताबाहेर गेला आहे आणि त्यात अमेरिकेपासून सुदान आणि चीनपर्यंत अनेकांचे हितसंबंध अडकले आहेत. दक्षिण सुदानमधील तेलसमृद्ध क्षेत्रात चीनची मोठी गुंतवणूक आहे. दक्षिण सुदानचीच नव्हे, तर सुदानची अर्थव्यवस्थाही त्या तेलावर अवलंबून आहे. या तेलक्षेत्रावर आज बंडखोरांनी कब्जा केला आहे आणि आरोप असा आहे, की सुदानचा त्या बंडखोरांना आशीर्वाद आहे. एकंदर दिसताना यादवी वगरे दिसली तरी हे तेलाचेच राजकारण आहे. आता सगळेच हे जाणतात, की तेलाचे राजकारण किती निसरडे असते. दक्षिण सुदानमधील संघर्ष आज त्याच निसरडय़ा वाटेवर आहे.