आपल्या मनात खोलवर जग रुजलं आहे म्हणून उघडय़ा डोळ्यांनी ते पाहण्याची आस असतेच, पण डोळे मिटल्यावरही ते दृष्टीपुढून ओसरत नाही. या जगातच सुख मिळवायचं आहे, या भावनेनं आपण सदोदित या जगाला आपल्या मनाजोगतं करण्यात गुंतून असतो, या अचलानंद दादांच्या उद्गारांवर प्रत्येकजण विचार करीत होताच, तोच अचलदादा म्हणाले..
अचलदादा – इतकच नाही, तर भवतालच्या जगात काहीही चालू असू दे, आपल्या मनात आपलंच जग असतं. त्या जगाच्या ‘दर्शना’तच आपण रममाण असतो..
कर्मेद्र – बाहेरचं जग आणि आपल्या मनातलं जग, असं काही वेगवेगळं असतं का?
ज्ञानेंद्र – हो.. निसर्गदत्त महाराजांना एकजण म्हणाला, जगात इतकं दु:खं भरून आहे, त्यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, माझ्या जगात असं काही नाही! त्यावर प्रश्नकर्ता आश्चर्यानं म्हणाला, तुमचं आणि माझं जग काय वेगळं आहे का? त्यावर ते म्हणाले, तुमचं जग मी जाणत नाही, माझं तुम्ही जाणत नाही! तुमचं जग तुमच्या मनाची निर्मिती आहे.. त्यांची ही प्रश्नोत्तरं मुळातच वाचली पाहिजेत, आपण परतलो की पुस्तकातून ती वाचूच.. पण खरंच आपण या दृश्य जगात राहात असलो तरी आपल्या मनात आपलं जग असतंच.. त्याचा केंद्रबिंदू ‘मी’च तर असतो..
अचलदादा – आणि या ‘मी’च्या केंद्रबिंदूनुसार ‘माझ्या’ जगाचा परीघ होतो.. मग दुसऱ्यांबरोबर असतानाही माझ्या मनात माझ्याच जगाचे विचार सुरू असतात.. मला माझ्या या जीवनात घडून गेलेले आणि माझ्या मनाला भिडलेले प्रसंगही अनेकवार ‘दिसत’ असतात.. भूतकाळातील या घटनांच्या ‘दर्शना’त किंवा भविष्यातील शक्यतांच्या कल्पना पाहण्यात मी अनेकदा दंगच असतो.. मग समोर काहीही घडत असो, कुणी माझ्याशी काही बोलत असो.. माझ्या जगाच्या तंद्रीत मी बुडालो की मला दुसरं काही दिसत नाही! मग जर मी असं तिन्ही त्रिकाळ आणि दृष्टीच्या तिन्ही पातळ्यांवर माझ्या अशाश्वत जगात गुंतू शकतो तर मग सदोदित सद्गुरूंच्या स्मरणात का नाही दंग होऊ शकत?
कर्मेद्र – पण सद्गुरूंचंच स्मरण कशाला हवं? देवाचं स्मरण नाही का ठेवता येणार?
अचलदादा – सद्गुरूंचं स्मरण अशासाठी की ते आपल्यासारखेच बाह्य़रूप घेऊन वावरत असतात.. तेही याच जगात वावरत असतात, त्यांच्याही देहाला आजार जडतात, माझ्याप्रमाणेच त्यांच्याही भौतिक जीवनात चढउतार होत असते.. या सर्वामध्ये ते आंतरिक आनंदात कसे सर्वकाळ राहातात, हे मला थेट दिसू शकतं..
कर्मेद्र – पण मला सद्गुरूच नाहीत आणि कुणा जिवंत माणसावर इतका विश्वास टाकणं मला तरी कधी साधेलंस वाटत नाही..
अचलदादा – काही हरकत नाही.. जिवंत माणसावर विश्वास नका ठेवू पण जे होऊन गेले त्यांचा तरी आधार धरायला काय हरकत आहे? मग ते साईबाबा असोत, अक्कलकोट महाराज असोत, गोंदवलेकर महाराज असोत.. कोणत्याही जाती-धर्म-पंथाचा सत्पुरुष तुम्ही आधार म्हणून स्वीकारू शकता.. अनंत रूपांत सद्गुरू प्रकटले आहेत आणि त्या सगळ्यांचं सांगणं एकच आहे! मनुष्य जन्म हा परमप्राप्तीसाठी आहे, हेच तर सगळे साधूसंत, सगळे धर्मग्रंथ सांगतात! मग कुणाही एकावर विश्वास ठेवा आणि त्याच्याच अशा ‘दर्शना’चा प्रयत्न करा ना!
कर्मेद्र – मग पुन्हा प्रश्न आला, आता समजा मी साईबाबांना मानतो.. मग मी त्यांच्या मूर्तीचं किंवा तसबिरीचं डोळ्यांनी दर्शन घेऊ शकतो. डोळे मिटून मी त्यांचं रूप डोळ्यासमोर आणू शकतो. पण तुमच्याशी बोलत असतानाही त्यांना कसा पाहू शकतो?
अचलदादा – मगाशी मी दासबोध वाचत असताना तुम्ही त्या घाटरस्त्यावर गेलाच होतात की नाही?
कर्मेद्र – अहो, पण तो माझ्या जीवनात घडून गेलेला प्रसंग आहे.. त्यामुळे तो आठवणं सोपं आहे..
अचलदादा – अगदी तसं सुरुवातीला साईचरित्र वारंवार वाचा, जाणून घ्या.. त्याच्या चिंतनात आणि मननात जसजसे रमू लागाल तसतसे त्या चरित्रातले प्रसंग डोळ्यासमोर आपोआप उभे राहतील.. मग तेच चरित्र जणू डोळ्यासमोर घडत आहे, असंच वाटेल!
चैतन्य प्रेम