News Flash

भगवती कशाला हवेत?

कोणतीही राजकीय व्यक्ती काय करू शकते किंवा काय करू शकत नाही, याचे आडाखे राजकीय पक्षाच्या परिप्रेक्ष्यातूनच मांडायचे असतात, हे कळण्यासाठी विद्वान असण्याची गरज नसते.

| January 15, 2015 12:22 pm

कोणतीही राजकीय व्यक्ती काय करू शकते किंवा काय करू शकत नाही, याचे आडाखे राजकीय पक्षाच्या परिप्रेक्ष्यातूनच मांडायचे असतात, हे कळण्यासाठी विद्वान असण्याची गरज नसते. तेव्हा नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सच्चे आहेत, योग्य दिशेने ते सुरू आहेत. परंतु त्यांना पुराणमतवादी हिंदुत्ववादी खीळ घालत आहेत, हे सांगण्यासाठी कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांची गरज काय? भगवती यांनी मंगळवारी दिल्लीत दिवंगत माधवराव शिंदे स्मृती व्याख्यानात मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. परंतु पुढे मोदी यांना त्यांच्या परिवारातील गंजक्या विचारांच्या नेत्यांपासून धोका आहे, ही मंडळी मोदी यांचा अर्थसुधारणांचा कार्यक्रम रुळांवरून घसरवू शकतात, असा धोक्याचा इशारा दिला. सामाजिक विचलता ही आर्थिक प्रगतीच्या आड येत नाही- म्हणजे दंगली घडत असूनही आर्थिक वाढ पुढे रेटता येते- या सिद्धान्ताचे भगवती हे पाईक. परंतु हा आवडता सिद्धान्त पुन्हा आळवतानाच भगवती यांनी या व्याख्यानात असाही इशारा दिला की, आर्थिक प्रगतीच्या धोरणांना सामाजिक पातळीवरील या विचलकांमुळे काही वर्षांत खीळ बसू शकते. भगवती आणि अरविंद पानगरिया हे गेली कित्येक वष्रे मोदी यांचे समर्थक आहेत. याचा अर्थ ते मोदी यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या राजकारणाचे निरीक्षक आहेत. तेव्हा मोदी आणि त्यांच्यामागच्या िहदुत्ववाद्यांचा मुद्दा इतकी वष्रे यांच्या लक्षात आला नाही? भगवती यांना मागास वाटणारे हे मोदीसमर्थक आताच उगवले की काय? या त्यांच्या ताज्या विधानामुळे दोनच शक्यता संभवतात. एक म्हणजे, त्यांना राजकीय वास्तवाची जराही जाण नाही. कारण ती असती तर पक्षीय भूमिकेपासून मोदी यांना वेगळे करण्याचा उद्योग ते करते ना. किंवा दुसरी म्हणजे, तेव्हाही त्यांना हे असे होईल असे वाटत होते, पण तरीही त्यांनी मोदी यांची पाठराखण केली. ही दुसरी शक्यता खरी असेल तर तीमागील कारण त्यांनी जनतेस सांगावयास हवे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेल्या अर्थतज्ज्ञांत दोन गट आहेत. नोबेल विजेते अमर्त्य सेन हे मोदीविरोधक आणि पानगरिया, भगवती हे मोदीसमर्थक. यातील पानगरिया यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावून मोदी यांनी त्यांची सोय केली. भगवती यांचे काय करायचे याचा निर्णय मोदी यांचा अद्याप झाला नसावा. तसा तो झाला असता आणि त्यांचीही कोठे नेमणूक झाली असती तर मोदी यांच्यामागील कर्मठांच्या कळपांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेच नसते असे म्हणता येणार नाही. कदाचित भगवती यांची तशी इच्छा नसेलही. परंतु मोदी यांच्यामागील मंडळींचे दर्शन त्यांना आताच झाल्यासारखी जी भाषा आहे, ती फसवी आहे. याचे कारण आपला मोदी यांच्याविषयीचा अंदाज चुकला असे कबूल करावयाची वेळ दुर्दैवाने त्यांच्यावर आलीच, तर निसटून जाण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी असा युक्तिवाद करून ठेवला असावा, असे म्हणता येईल. यास चातुर्य म्हणतात, विद्वत्ता नव्हे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:22 pm

Web Title: jagdish bhagwati praises pm modi but warns against rss corrosive ways
टॅग : Rss
Next Stories
1 तंबू आणि नवे उंट..
2 रागावलेला ‘पाव्हणा’!
3 ‘महान’तेच्या रक्षणासाठी..
Just Now!
X