02 July 2020

News Flash

ज्ञानाधारित उद्योग

पंतप्रधान मोदी यांनी अगोदर  'भारतात बनवा' आणि आता 'डिजिटल भारत' अशा  घोषणा केल्या आहेत.  हे दोन्ही उपक्रम यशस्वी करायचे असतील,  औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या

| July 10, 2015 01:01 am

पंतप्रधान मोदी यांनी अगोदर  ‘भारतात बनवा’ आणि आता ‘डिजिटल भारत’ अशा  घोषणा केल्या आहेत.  हे दोन्ही उपक्रम यशस्वी करायचे असतील,  औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या असतील तर केवळ पारंपरिक उद्योगांवर अवलंबून न राहता ज्ञानाधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे जरुरी आहे..
डिजिटल भारत या संकल्पनेचे थाटात उद्घाटन नुकतेच पार पडले. अजूनही पूर्ण भारत चांगल्या डांबरी रस्त्यांनी जोडला गेलेला नाही. मुंबईपासून अगदी ५० कि.मी.वर असलेल्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील कित्येक गावांत अजून रुग्णवाहिका पोहचू शकत नाही, पण गेल्या १०-१२ वर्षांत जवळजवळ संपूर्ण भारत हा भ्रमण-दूरध्वनीच्या माध्यमातून जोडला गेला आहे. संपर्क क्षेत्रात भारतात झालेली ही क्रांती विलक्षण आहे. सर्व जगात या गतीने कदाचित कुठचीच क्रांती झाली नसेल. १० वर्षांत ५० ते ६० कोटी भारतीय जगाशी जोडले गेले. डिजिटल भारताची ही तर नुसती सुरुवात आहे. एकदा संपूर्ण देश जोडला गेला की एकीकडे तिसरी, चौथी पिढी राबवत या संपर्काची गती व व्याप्ती वाढवायची. पण त्याचबरोबर ज्ञान, विज्ञान व शासन सेवा या पूर्ण भारतीयांच्या दरवाजात नेऊन ठेवायच्या, हाच ‘डिजिटल भारत’ मोहिमेचा उद्देश आहे. भारताच्या अर्थकारणात व उद्योगात होणारे बदल व त्याचे आर्थिक-सामाजिक फायदे अर्थसाखळीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे ‘डिजिटल भारत’ हे महत्त्वाचे साधन ठरावे हीच अपेक्षा आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये मात्र ज्ञान व माहिती हे दोन नवीन घटक उत्पादन घटकांच्या यादीत येऊ लागले.  पुढील ३ ते ५ दशकांमध्ये प्रत्येक अर्थव्यवस्था ही या उत्पादन घटकावर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागेल. या उत्पादन घटकाचे इतर उत्पादन घटकांपेक्षा एक ठळक वेगळेपण आहे. इतर घटक त्यांच्या उपयोगानुसार घटत जातात. ज्ञान या घटकाचे मात्र तसे नाही. ज्ञानाचीही महती आपल्या पुरातन संस्कृत श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. हा एकच असा घटक आहे की तो वापरल्यावर वाढतो! म्हणजेच ज्ञान या घटकाचा तुम्ही जेवढा जास्त वापर कराल तेवढे हे ज्ञान वाढत जाईल. म्हणजेच या घटकाची उत्पादकता इतर घटकांच्या तुलनेत खूपच जास्त ठरते. ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेचा यशस्वी प्रयोग करायचा असेल तर मुळात भारतात ज्ञानावर आधारित उत्पादन व उद्योगाची नितांत गरज आहे. ज्ञानाधारित उद्योग म्हणजे ज्या उत्पादन वा सेवा क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी वा सेवा पुरवण्यासाठी ज्ञानाचा वापर केला जातो व जेथे ज्ञानाच्या उपयोगाने तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रगतिशील वापर करून उद्योग भरभराटीला येतो असे उद्योग. आज ज्ञानावर आधारित सेवा जशा संगणक वा माहिती तंत्रज्ञान सेवा आहेत किंवा उत्पादन क्षेत्रात जैविक तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान अशा अनेक नवीन औद्योगिक शाखा सतत विकसित होत आहेत. १९५०च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योगाला सुरुवात झाली. १९८० च्या नंतर याची भारतात सुरुवात झाली, पण त्यानंतर भारतात या ज्ञानाधारित उद्योगाची इतकी वाढ झाली की १९९० साली केवळ १०० कोटी रुपयांची निर्यात करणारा भारत, या क्षेत्रातील निर्यातीत ८० हजार कोटी रुपयांच्या घरात निर्यात करत जगातील एक आघाडीचा निर्यातदार बनला. डिजिटल भारत संकल्पनेत माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे. अर्थात ज्ञानाधारित उद्योग म्हणजे केवळ नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योग असा होत नाही. आज बऱ्याच परंपरागत उद्योगांमध्ये ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच या उद्योगांमध्ये ज्ञान या उत्पादन घटकाचा अधिकाधिक वापर करण्याकडे उद्योगांचा कल दिसतो आहे. माझ्या मते अशा उद्योगांनाही आता ज्ञानाधारित उद्योग म्हणण्यास काही हरकत नसावी. उदाहरणार्थ- आज वैद्यकीय क्षेत्रात बहुतेक शल्यक्रिया या संगणक आधारित उपकरणांच्याद्वारे करण्यात येतात. रोगाचे निदान करण्याच्या पद्धती व उपकरणे यामध्ये जो क्रांतिकारक बदल झाला आहे तो केवळ ज्ञानाधारित उत्पादन घटकांच्या साहाय्याने! आज विमान किंवा चारचाकी वाहन बनवणारे उद्योग घ्या. जास्तीत जास्त संगणकीय प्रणालींचा वापर करत ही वाहने सुरक्षितपणे, जास्त वेगाने व कमी ऊर्जेच्या वापराने कशी चालवता येतील याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येते. याचाच अर्थ वैद्यकीय उपकरणे वा वाहन-विमान उत्पादन हे उद्योगही ज्ञानाधारित उद्योगांच्या साखळीमध्ये बसत चालले आहेत. ज्ञानाधारित उद्योगांमध्ये आणखी एक प्रकार मोडतो. आजकाल जवळजवळ सर्वच उद्योगात नवीन संकल्पनांसाठी गुंतवणूक केली जाते. या नवीन संकल्पना उत्पादकतेमध्ये वा उत्पादनांमध्ये उतरवून बाजारात सतत नावीन्यपूर्ण माल वा सेवा कशा आणता येतील याकडे सर्वच उद्योगांचे लक्ष असते. आजच्या युगात ज्ञानावर अशी गुंतवणूक केली नाही तर त्या उद्योगाचे अस्तित्वच संपण्याची भीती कायम प्रत्येक उद्योजकात असते. याचाच अर्थ ज्ञान हा उत्पादन घटक आज अनिवार्य बनत चालला आहे. आणि म्हणूनच येणारे युग हे ज्ञानाधारित उद्योगांचे असेल यात तिळमात्रही शंका नाही.
जेव्हा एखादा नवीन उत्पादन घटक औद्योगिक क्षेत्राचा चेहरा बदलण्यास सुरुवात करतो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक व शासकीय वातावरणात अशा बदलांना पोषक वातावरण निर्माण करणेही जरुरीचे असते. आपल्यातील बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की भारतातील बौद्धिक संपदेचे धनी असणारे बरेच विद्यार्थी अमेरिकेत राहून जास्त यशस्वी का होतात? इतर कारणांबरोबर त्या देशातील सामाजिक व शासकीय वातावरण हे अशा विद्यार्थ्यांना अत्यंत पोषक ठरते. आज अमेरिकेतील बहुतेक सर्व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कित्येक भारतीय उच्च पदावर व अत्यंत यशस्वी आहेत. हेच लोक भारतात आले वा राहिले असते तर असे यशस्वी झाले असते का? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असेच द्यावे लागेल. पण याही परिस्थितीत भारतात राहून जे उद्योजक यशस्वी ठरले, त्यांचा आदर्श आज तरुण पिढीने ठेवणे जरुरी आहे. नवीन उद्योजकाला ७०-८० च्या दशकात आपला उद्योग सुरू करणे खूपच कठीण होते, पण १९९०च्या नंतर भारतात जे बदल घडत गेले त्यामुळे नवीन व खासकरून ज्ञानाधारित उद्योगांच्या उभारणीला व वाढीला मदत झाली. संगणक व माहिती तंत्रज्ञानातील उद्योगांची वाढ हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. माझ्या मते या उद्योगाने जगाला भारताची एक वेगळी ओळख करून दिली. ज्ञानाधारित उद्योगांमध्ये भारतीय तरुण-तरुणी जागतिक उद्योगांमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असा विश्वास या उद्योगाच्या यशामुळे जगाला मिळाला. आज म्हणूनच जागतिक कंपन्यांच्या अनेक अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या आराखडय़ांची आखणी भारतीय उद्योग भारतातून करत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित हा ज्ञानोद्योग भारताला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देत आहे व प्रचंड वेगाने हा उद्योग वाढत आहे. आज उत्पादनात वापरले जाणारे यंत्रमानव, माहिती तंत्रज्ञान, संगणक, संगणक आधारित वाहने, विमाने, उपकरणे, जैविक तंत्रज्ञान, सूक्ष्म तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत उद्योग येताना व भरभराट करताना दिसतील.
भारतातही चित्र वेगळे नाही. भारतीय भांडवली बाजारात आज सर्वात जास्त मूल्य असलेली कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी. या कंपनीचे आज बाजारमूल्य ५ लाख कोटी एवढे मोठे आहे. थोडय़ाशा बारकाईने पाहिले तर टाटाच्या इतर सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य एकत्र केले तरी ते टाटा कन्सल्टन्सीपेक्षा कमी भरेल. ज्ञानाधारित उद्योगांचा हा परिणाम केवळ भारतात नाही तर जगात दिसतो. जनरल मोटर्स किंवा जनरल इलेक्ट्रिकल अशा जुन्या प्रचंड आकाराच्या उद्योगांपेक्षा काल आलेले गुगल, अमेझॉनसारखे उद्योग बाजारभावात वरचढ असल्याचे जाणवले आहे. भारतातील पहिल्या १० माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या बघितल्या तर त्यांचे एकंदर बाजारमूल्य आज ११ लाख कोटींच्या वरती आहे. याच निकषावर पहिल्या १० खाजगी वित्तसंस्थांचे बाजारमूल्य साडेसात लाख कोटी रुपयांचे आहे तर पहिल्या १० सरकारी वित्तसंस्थांचे बाजारमूल्य हे केवळ ३.४० लाख कोटी रुपयांचे आहे. या सर्व कंपन्यांचे वय लक्षात घेतले तर या मूल्य फरकाची तीव्रता अधिक जाणवते. पुढे येणाऱ्या ज्ञानाधारित उद्योगांना हे यश नक्कीच खुणावत असणार. पण हे यश प्रचंड प्रमाणात व जागतिक पातळीवर मिळवायचे असेल तर त्याकरिता भारताला शिक्षण व कौशल्य या दोन्ही विभागात बरेच काम करायला लागणार आहे. शासकीय यंत्रणा अशा उद्योगांना मारक न ठरता मदत कशी करू शकेल याकडे पाहणे जरुरी आहे.
जैविक तंत्रज्ञान व सूक्ष्म तंत्रज्ञान ही माझ्या मते येणाऱ्या काळात ज्ञानाधारित उद्योगात आमूलाग्र बदल घडवून आणतील. उदाहरणार्थ- आज जगभरात मूलपेशींच्या आधारे विविध रोग कसे बरे करता येतील यावर प्रचंड संशोधन सुरू आहे. त्यावर आधारित एक दोन उपचार पद्धतीही बाजारात येऊ पाहत आहेत. भारतात काही औषध कंपन्या व काही नवीन उद्योग या क्षेत्रात येत आहेत. प्रथमत: त्यांना विविध जुन्या कायद्यांचा व परवान्यांचा धाक दाखवला जातो. त्यातून ते तरले तर समाजातील काही तज्ज्ञ म्हणवणारी मंडळी असे होणारे बदल मानण्यासच तयार नसतात. नवीन बदलांना अंगीकारणे हे एकंदरीतच कठीण असते. अमेरिकेसारख्या समाजात असे बदल लवकर अंगीकारले जातात व ज्ञानाधारित उद्योग म्हणूनच तेथे भरभराटीस येतात. हे भारतात व्हायचे असेल तर भारतीय शासनकर्ते व समाज या दोघांनीही आपली मानसिकता बदलणे जरुरी आहे. ज्ञानाधारित उद्योगांची कोणतीही उत्पादने सुरुवातीला बाजारात महाग असतात, पण कालांतराने बाजार जसजसा हा बदल अंगीकारतो तसतशा या किमती अगदी गरिबांना परवडतील इथपर्यंत खाली येतात. भ्रमणदूरध्वनी हे याचे जिवंत उदाहरण आहे. ‘भारतात बनवा’ किंवा ‘डिजिटल भारत’ अशा दोन्ही घोषणा यशस्वी व्हायच्या असतील,  औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या असतील तर केवळ पारंपरिक उद्योगांवर अवलंबून न राहता ज्ञानाधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे जरुरी आहे. या उद्योगांमुळे बाजारमूल्य वृद्धी होईलच, पण उद्योगांमध्ये जागतिक पातळीवर चीनसारख्या बलाढय़ अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करत बसण्यापेक्षा ज्ञानाधारित उद्योगांच्या मदतीने चीनच्या पुढे जाण्याची संधी भारताकडे आहे.
 दीपक घैसास – deepak.ghaisas@gencoval.com
* लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक    संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय        सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 1:01 am

Web Title: knowledge based industries create opportunity to go ahead of china
Next Stories
1 आरोग्यातील धनसंपदा
2 अर्थव्यवस्थेत वित्तसंस्था
3 संरक्षणातील उद्योग
Just Now!
X