News Flash

राजकीय वर्चस्वाचा धोका

‘आणखी एक पोपट’ हा अग्रलेख (२७ जुल ) वाचून गुंतवणूकतज्ज्ञ मार्क फेबर यांनी २००८ मध्ये काढलेल्या उद्गारांची आठवण टी.व्ही.१८ या चॅनलवरील एका संभाषणात लेहमनसारखी परिस्थिती

| July 30, 2015 12:46 pm

‘आणखी एक पोपट’ हा अग्रलेख (२७ जुल ) वाचून गुंतवणूकतज्ज्ञ मार्क फेबर यांनी २००८ मध्ये काढलेल्या उद्गारांची आठवण टी.व्ही.१८ या चॅनलवरील एका संभाषणात लेहमनसारखी परिस्थिती किंवा सब प्राइमसारखी परिस्थिती भारतात उद्भभवू शकते का? – त्यांनी म्हटले भारतीय बँकिंग आणि अर्थव्यवस्थेवर ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’ची बारीक नजर असते. नियंत्रण असते त्यामुळे सब प्राइमसारखा बेशिस्त कारभार भारतात होणार नाही.
आज एकूणच उद्योगपतींच्या धनशक्तीवर निवडून येणारे राजकारणी बँक व्यवस्थेचे काय करतील सांगता येणे कठीण आहे. अशा परिस्थितीत रिझव्‍‌र्ह बँकेवर राजकीय वर्चस्व अत्यंत धोकादायक वाटते. किंबहुना ते नसावे, हेच देशाच्या अर्थ व्यवस्थेला सुरक्षित सांभाळेल. स्वार्थी आणि संकुचित राजकारण्यांना ते जमणार नाही.
सीमा भाकरे, पुणे

राजापूरची गंगा अनियमित कशी?
‘राजापूरची गंगा १० महिन्यांतच अवतरली’ या शीर्षकाची बातमी (लोकसत्ता, २९ जुलै) वाचली. ही  गंगा सर्वसामान्यपणे दर तीन वर्षांनी प्रकटते; पण या वेळी ती अवघ्या १० महिन्यांतच प्रकट झाली.  तेथील चौदाही कुंडांत भरपूर पाणी येत आहे. त्या परिसरात भरपूर पाऊस पडत असल्याने तसेच जमिनीच्या खालील नसíगक प्रवाहांमध्ये झालेल्या बदलामुळे असे नेहमीपेक्षा वेगळे घडू शकते. सर्वसामान्यांना उमगणाऱ्या निसर्गाच्या नियमांपेक्षा काही वेगळेपण जाणवले की त्याला ‘दिव्यत्वाची प्रचीती’ किंवा ‘ईश्वरी संकेत’ मानण्याची पद्धत जगभरातील श्रद्धाळूंमध्ये दिसते. त्यामुळेच दर तीन वर्षांनी गंगेने प्रकटणे हे ‘दैवी’ मानले गेले. असे वेगळेपण दिसणारी इतरही काही स्थाने (उदा. गरम पाण्याचे झरे) दैवी साक्षात्कार / चमत्कार मानले जातात व श्रद्धास्थाने बनतात.
पण सध्याची गंगेची अनियमितता ही नसíगक कारणांमुळे नाही का? जर त्यामागे दैवी कारण असते तर कोणत्याही परिस्थितीत गंगा तीन वर्षांनीच प्रकटली असती. बदललेल्या नसíगक परिस्थितीमुळे त्यात मुळीच बदल झाला नसता. ‘लोकसत्ता’मधील शरद बेडेकरांच्या ‘मानव विजय’ मालेतील लेख वाचून त्यावर विचार करणाऱ्या सर्व वाचकांसाठी ही एक नोंद घेण्यासारखी घटना आहे.
दीपक गोखले, कोथरूड, पुणे  

कोणते यश हवे, हे शिवसेनेने ठरवावे
‘सह्याद्रीचे वारे’ या सदरातील ‘त्यांना जमले; ते यांना  जमेल?’ हा संतोष प्रधान यांचा लेख ( २८ जुलै) वाचला.
शरद पवार यांच्याप्रमाणे  राजकारणाची जाण, समस्यांचा सखोल अभ्यास , परिस्थितीचा वेध घेण्याची बुद्धी, आक्रस्ताळेपणा टाळून, थोडे धीराने पण धीमे पणाने पावले टाकणे( क्रिकेटच्या भाषेत ’गुगली / यॉर्कर  टाकणे), समोरच्याची दुखरी/ कमकुवत  नस ओळखून त्यावर संधान करणे  हे व असे गुण ज्यादिवशी शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व व आमदार/ खासदार स्वतचे अंगी बाणवतील, त्यादिवशी त्यांचीही दखल इतर पक्षांना घ्यावीच लागेल.
मात्र त्यासाठी, तात्काळ मिळणारे फसवे यश नि दीर्घकालीन  शाश्वत यश यातील फरक समजणे  आवश्यक आहे.
तोपर्यंत वसंतराव नाईकांपासून चालू असलेली ‘वापरून घेणे’ ही परंपरा शिवसेनेच्या नशिबी राहणार आहे , हे दुर्दैव असले तरी अपरिहार्य आहे.
श्रीधर गांगल, ठाणे

शोकमग्न असतानाही इंटरनेटवर दादागिरीचे दर्शन..
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल (लोकसत्ता २८ जुल ) असताना इंटरनेटच्या मायाजालात दिवसभर एक वेगळीच दादागिरी पाहायला मिळाली. या ऑनलाइन गुंडांच्या दादागिरीची ही उदाहरणे-
१) एका झटक्यात भारतीय मुस्लिमांना यांनी धर्मनिरपेक्ष, राष्ट्रप्रेमी मुस्लीम व देशद्रोही असे वेगळे केले. तसेच भारतीय मुसलमानांना कलामांचा आदर्श घेऊन त्यांच्यासम राष्ट्रसेवा करण्याची सल्लावजा धमकी हे लोक देत होते.
२) यांच्या या दादागिरीतून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील याही सुटल्या नाहीत. दिवसभर कलाम व पाटील यांच्या कार्यकाळाचा ‘तौलनिक अभ्यास’ हे तीळपट करत होते.
३) याचेच पुढचे उदाहरण म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा कडून ट्विटरवर कलामांच्या उल्लेखात झालेली चूक. ती चुकली हे मान्य असले तरी ज्या पद्धतीने तिच्यावर या गुंडांनी अश्लील टीका केली ती अयोग्य व ‘शोकाकुल राष्ट्रा’ला अशोभनीयच.
या तीन उदाहरणावरून हे स्पष्ट होते की रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये दिसणारी गुंडागर्दी आता इंटरनेटवर व्यापक होताना दिसत आहे. खोटे व बदल केलेले फोटो टाकणे हे तर नित्याचेच झाले आहे. या अदृश्य व समाजातील शांततेला घातक ठरतील अशा गुंडांना थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, काय वाईट व काय चांगले अथवा काय खरे आणि काय खोटे हे ठरवण्याचे काम या घटकांकडून होत आहे. या मायाजालातून हे लोक सापडणे मुश्कील असले तरी,   यांच्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांसाठी तसेच सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांसाठी पुढील काळ हा भयंकर असेल असे दिसते.
विजय फासाटे, पुणे

हा ‘मान’ की ‘अपमान’?
महान शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती आणि भारताचे ‘मिसाइल मॅन’ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी, ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर त्यांच्याविषयी आलेल्या आठवणी/आख्यायिकांपैकी एक – ‘शिलाँग येथील भाषणासाठी जात असताना त्यांच्या संरक्षणासाठी पुढच्या जीपमध्ये एक जवान अडीच तास उभा होता. कलामांनी त्याला विचारले की तू दमला नाहीस का? त्यावर त्या जवानाने उत्तर दिले – ‘आपल्यासाठी मी सहा ताससुद्धा उभा राहीन!’’
..असा आदर आणि सन्मान मागून मिळत नाही, हे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांना केव्हा कळणार! त्यांना लोकांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मान द्यावा म्हणून आदेश (जीआर) काढावा लागतो हे दुर्दैवी आहे. कहर म्हणजे नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेतही लोकप्रतिनिधींना प्राधान्य द्यावे असे या आदेशात म्हटले आहे. हे म्हणजे ‘माकडाच्या हाती कोलीत’ देण्यासारखे आहे. आधीच सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. कारकून व अधिकारी आपली जागा सोडून अन्यत्रच असतात. त्यातच आमदार, खासदार आल्याचे निमित्त त्यांना मिळेल. सरकारला थोडी तरी सदसद्विवेकबुद्धी असेल तर त्यांनी हा आदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा हा नागरिकांचा ‘अपमान’ असेल.
चिंतामणी भिडे, वृंदावन (ठाणे)

त्याच पगारात हेही करा..
लोकप्रतिनिधींशी सरकारी कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे असा आदेश राज्य सरकारने काढल्याची बातमी ‘लोकसत्ता’त (२९ जुलै) वाचली!  कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना योग्य तो मान द्यावा असेही त्यात म्हटले आहे.  त्याचप्रमाणे, ‘सरकारी कर्मचाऱ्यांनी कामासाठी आलेल्या लोकांशीही सौजन्याने वागावे व त्यांचे काम शासन त्यांना देत असलेल्या पगारामध्येच करावे’ असेही एक पत्रक आता महाराष्ट्र सरकारने काढावे.
रमण गांगल, कर्जत (जि. रायगड)

शिदोरी आहेच..
‘विज्ञानेश्वराचे प्रस्थान’ हा अग्रलेख (२९ जुलै) वाचला.  राष्ट्रपती, शात्रज्ञ किंवा मुलांचे ‘चाचा’ म्हणून प्रत्येक गोष्टीत ते अंतकरणापासून सामील होत असत. ते आपणाला आयुष्यभराची शिदोरी देऊन निघून गेले. त्या शिदोरीतून प्रेरणा घेऊन त्यांच्या ‘स्वप्नातला भारत’ घडविण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
 – किरण मुंडे, परळी वैजनाथ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:46 pm

Web Title: lokmanas letter to editor 2
Next Stories
1 कलामांचे कार्य यापुढेही सर्वाना बळ देत राहील
2 क्रियेवीण वाचाळता..
3 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प धोकादायकच!
Just Now!
X